भाव कोसळल्याने शेतक-यांनी फेकले टोमॅटो रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 19:05 IST2017-09-02T19:05:29+5:302017-09-02T19:05:49+5:30
टोमॅटोचे भाव अचानक कोसळल्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी शनिवारी सकाळी नऊ वाजता बाजार समिती समोरच काही काळ नाशिक-पुणे महामार्ग रोखून धरला. काही शेतक-यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकत आपला रोष व्यक्त केला.

भाव कोसळल्याने शेतक-यांनी फेकले टोमॅटो रस्त्यावर
ल कमत न्यूज नेटवर्कसंगमनेर : बकरी ईदमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत बहुतांशी लिलाव बंद असल्याने टोमॅटोचे भाव अचानक कोसळल्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी शनिवारी सकाळी नऊ वाजता बाजार समिती समोरच काही काळ नाशिक-पुणे महामार्ग रोखून धरला. काही शेतक-यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकत आपला रोष व्यक्त केला. शनिवारी गावच्या आठवडे बाजाराच्या दिवशी तालुक्यातील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणले होते. बकरी ईद असल्याने अनेक व्यापा-यांनी आपले लिलाव बंद ठेवले होते. आवक अधिक झाल्याने टोमॅटोचे भाव ६०० ते ७०० रुपयांवरून २०० ते ३०० रूपये इतका घसरला. कालपर्यंत चांगला भाव मिळत होता, मात्र आज अचानक कमी झालेल्या भावामुळे शेतक-यांनी संत्पत होत बाजार समिती समोरच वाहने आडवी लावत रास्ता रोको सुरू केला. यामुळे काही काळ महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अचानक भाव कोसळल्याने तालुक्यातील विविध गावातील आलेल्या काही शेतक-यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकत आपला रोष व्यक्त केला. वातावरण तणावपूर्ण बनल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, पोलीस उपनिरीक्षक शंकरसिंग रजपूत हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच तहसीलदार साहेबराव सोनवणे हे देखील घटनास्थळी आल्यानंतर प्रशासनाने शेतक-यांची समजूत काढल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.