यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवरील वर्चस्वासाठी सर्वच पक्षांनी लगनीघाई सुरू केली आहे. मात्र अंतर्गत दुहीमुळे काही पक्षांसमोर संकट उभे ठाकले आहे. त्यावर मात करून सत्तेचा सोपान चढण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर सत्ता प्राप्तीसाठी सर्वच पक्ष सक्रिय झाले. जिल्हा परिषदेतूनच राज्याला अनेक आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री मिळाले. त्यामुळे जिल्हा परिषदेवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली. मात्र काही पक्षांतील दुही यात अडथळा ठरत आहे. अपवाद वगळता आजपर्यंत येथील जिल्हा परिषदेवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. तथापि गेल्यावेळी राष्ट्रवादीने ऐनवेळी काँग्रेसला झटका दिल्याने अडीच वर्षे शिवसेनेला सत्तेची चव चाखता आली होती. फेब्रुवारीत होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी नव्या दमाने मोर्चेबांधणी चालविली आहे. काँग्रेसने जनआक्रोश यात्रेच्या माध्यमातून थेट जनतेत मिसळून केंद्र व राज्य शासन कुचकामी असल्याचे मतदारांच्या लक्षात आणून देण्याचा खटाटोप चालविला. मात्र नवीन जिल्हाध्यक्षांची निवड आधी करावी, या मागणीने आता ही यात्राच वांद्यात सापडली आहे. भाजपाने त्यांच्या ताब्यातील विधानसभा मतदार संघात विकास कामांच्या भूमिपूजनांचा सपाटा सुरू केला. लहान-सहान कामांचेही दिमाखदार भूमिपूजन सुरू झाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री व राज्य शासनात ऊर्जा, उद्योग आदी विभागांचे राज्यमंत्री पद असल्याने हा पक्ष ताकदवान झाला. त्याचा लाभ घेत भाजप सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. इतर पक्षांतील काठावरील इच्छुकांना जाळ्यात ओढण्याचे सत्र भाजपाने सुरू केले आहे. शिवसेनेनेही तालुकास्तरावर इच्छुकांच्या मुलाखतींचे सत्र सुरू केले. पालकमंत्री पद असल्याने शिवसेनाही यावेळी मोठ्या जोमाने निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची तयारी करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बैठक घेऊन निवडणुकीचा बिगुल फुंकला खरा, मात्र या पक्षात खदखद सुरू आहे. काही माजी पदाधिकारी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहे. सर्वच पक्षांसमोर कमी अधिक प्रमाणात पक्षांतर्गत वादाची समस्या आहे. त्यातून मार्ग काढून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर वर्चस्व प्राप्त करण्यात त्यांची दमछाक होण्याची चिन्हे आहेत.(शहर प्रतिनिधी) एमआयएम निवडणूक लढणार काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांशिवाय मनसे, बसपा, आरपीआयसुद्धा या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत काही ठिकाणी एमआयएम पक्षाला भरीव यश मिळाले. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये एमआयएमचे उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी जिल्हा परिषद व पंचायत समितींची निवडणूक रंगतदार होईल.
जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी लगीनघाई
By admin | Updated: December 29, 2016 00:21 IST