धम्मचक्र प्रवर्तन दिनाची आठवण करून देणारी रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. अन् लाखो बांधवांना दीक्षा देऊन सन्मानाचे नवजीवन प्रदान केले. या ऐतिहासिक क्षणाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन. हा दिवस नागपुरात दरवर्षी साजरा होते. यासोबतच प्रत्येक गाव, वस्ती आणि शहरामध्ये या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. यवतमाळातही या दिवसाच्या अनुषंगाने १९७९ मध्ये विशाल रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीचे नेतृत्व जपानचे भंते तथा दीक्षाभूमीचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी केले होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेले अनेक बांधव त्या आठवणीला आजही उजाळा देतात. धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षा घेण्यासाठी गेलेल्या काही बांधवांना हा क्षण आजही स्मरणात आहे. यवतमाळच्या पाटीपुऱ्यातील कमलाबाई गायकवाड त्याच्या प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. त्यावेळी त्या १२ वर्षांच्या होत्या. आज त्या ७२ वर्षांच्या आहेत. त्यावेळी त्यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाकवी पदवी दिलेले राजानंद गडपायले, हिरामण सोनडवले, श्रीराम गायकवाड, वसंत चंदनखेडे, रामा गेडाम, रामचंद्र महाजन, बालाराम टेंभुर्णे, जनपथकर गुरूजी, राजाराम रामटेके, दौलतकर गडपायले, जाईबाई रामटेके, दौलत पाटील यांच्यासह अनेक जण जथ्थ्याने यवतमाळातून धम्मदीक्षासाठी नागपुरात गेल्याचे त्या सांगतात. सोनं लुटून आले, मी आणि धनी माझं, आनंद मनी माझ्या मावेना आज या गीताने त्यावेळी धूम केली होती. आजही हे गीत तितक्याच गोडीने ऐकले जाते. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांना ऐकण्यासोबतच दीक्षा घेण्यासाठी उसळलेली गर्दी यापूर्वी त्यांनी कधीही पाहिली नव्हती, असे त्या सांगतात. यानंतरच्या काळात दसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तनदिनाचा कार्यक्रम स्मरण म्हणून सुरू झाला. १९७८-१९७९ ला समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठे आयोजन करण्याचे ठरविले. या दिवशी सर्वात मोठी रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे, या रॅलेचे नेतृत्व जपानचे भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी केले होते. त्यावेळी वाहनावर मोठा रथ तयार करण्यात आला होता. त्यावर भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा होती. भंतेजी आसनस्थ होते. या रॅलीचे नंतर सभेत रूपांतर झाले. या सभेसाठी पंजाबमधील भीमपत्रिकेचे संपादक एल. आर. बाली यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलविण्यात आले होते. यानंतर समता सैनिक दलाच्या नेतृत्वात विविध कार्यक्रम पार पडले. यासाठी मा. म. देशमुख, नलिनी सोमकुवर, श्रीरंग वारे, तु. ग. पाटील यासारखे वक्ते येऊन गेले, अशी माहिती नाग संघटनेचे प्रमुख आनंद गायकवाड यांनी दिली. धम्मदीक्षा घेणारा प्रत्येक जण वर्षावासाचा उपवास करतो. त्याकरिता तीन महिने पवित्र मानले जातात. आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन करण्यात येते. विशेष म्हणजे, याची समाप्ती धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या लगतच असते. यामुळे धम्मदीक्षेत वर्षावासाला अधिक महत्त्व आहे.
यवतमाळातील पहिली रॅली
By admin | Updated: October 11, 2016 02:54 IST