यवतमाळ : यवतमाळ वनवृत्ताचा कारभार सध्या पूर्णपणे ढेपाळला आहे. राखीव वनातील सागवान तस्करीने येथे कळसच गाठला आहे. त्यात आता वन्यप्राण्यांच्या शिकारीने भर घातली असल्याचे दिसून येते. यवतमाळ वन विभागासह संपूर्ण वन वर्तुळातच मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांच्या शिकारी होत आहे. गेल्या वर्षभऱ्यात शिकारीच्या अनेक घटना उघडकीस आल्या. त्यात बिबटाच्याच शिकारी आढळून आल्या आहे. असे असताना या शिकारींची फारशी गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचे दिसून येत नाही. यवतमाळ वन विभागातील लासीना येथे एका बिबटाची शिकार झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर जोडमोहा वनपरिक्षेत्रात बिबटाच्या शिकारीच्या दोन घटना उघडकीस आल्या. या घटनेची शाही वाळते न वाळते तोच येथील धामणगाव मार्गावरील मोहा शिवारात एका बिबटाचा मृतदेह आढळून आला होता. यवतमाळ वनपरिक्षेत्रातील वाघापूर बीटमध्येही राखीव वनात एक बिबट कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर आता पुसद वनपरिक्षेत्रातील शेंबाळपिंपरी शिवारात बिबटाचा चामडे सोललेला मृतदेह आढळून आला. बिबटाचे चामडेच बेपत्ता असल्याने त्याची शिकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्यानंतर शिकाऱ्यांच्या मुसक्या मात्र आवळल्या गेल्या नाही. त्यामध्ये वन विभाग सपशेल अपयशी ठरला. वन्य प्राण्यांची शिकार हा कळीचा मुद्दा झाला असताना त्यावर अंकुश निर्माण करण्यासाठी वन विभागाला अपयश आले. एवढेच नव्हेतर हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर बीटमधील शेकडो सागवान वृक्षांची कत्तल करून लाकूडसाठा तस्करी करण्यात आला. ट्रक फसल्याने घाटंजी वनपरिक्षेत्रातील साखरा आणि हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर बीटमधील लाकूड साठा लंपास करण्याच्या दोन गंभीर घटना टळल्या. पुसद वनपरिक्षेत्रातही या पूर्वी ट्रक फसल्यानेच शेकडो सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करी उघडकीस आली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात या घटना घडल्यानंतरही वन विभाग त्याबाबत फारसे गंभीर नाही. त्यातूनच अलिकडे जोडमोहा वन परिक्षेत्रातील मार्तंडा आणि पहूर बीटमध्ये शेकडो सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करी उघडकीस आली. एकूणच वन संरक्षणावर येथील वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यातूनच या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. राखीव वनातील गस्तही कागदोपत्रीच होत असल्याचेही अनेक घटनांवरून पुढे आले आहे. त्यावर आता वरिष्ठ काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
यवतमाळ वनवृत्तात वन्य प्राण्यांच्या शिकारीत वाढ
By admin | Updated: October 25, 2014 22:48 IST