बँकेची नकारघंटा : बळीराजा चेतना अभियान मदत देईल का ?यवतमाळ : अंगावर कर्जाचा डोंगर, बँकेने कर्ज पुनर्गठनास दिलेली नकारघंटा यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने विषाचा घोट घेतला. सुदैवाने त्याला वेळीच उपचार मिळाले. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नाने त्याचे प्राण वाचले. मात्र आता त्याच्या जगण्यासाठी मदतीचा हात कोण पुढे करेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कळंब तालुक्यातील कैलासपुरी जांभुळी शिवारात हुसेन लखमाजी मेश्राम यांचे सहा एकर शेत आहे. निसर्ग प्रकोपामुळे गत सहा वर्षात पीकच झाले नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. त्यांच्यावर दीड लाखांचे कर्ज आहे. स्टेट बँकेत कर्ज पुनर्गठन करण्याची मागणी केली. मात्र बँकेने नकारघंटा दिला. उधारीवर बियाणे घेवून शेताची पेरणी केली. मात्र पावसाने दडी मारल्याने पीक उद्ध्वस्त होऊ लागले. अशा स्थितीत ५ सप्टेंबर रोजी हुसेनने विषाचा घोट घेतला. हा प्रकार लक्षात येताच प्रथम मेटीखेडा व नंतर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी वाहनासाठीही मेश्राम परिवाराकडे पैसे नव्हते. २०० रुपये उसणवार करून त्याला यवतमाळच्या दवाखान्यात आणण्यात आले. चार दिवस शर्थीच्या प्रयत्नानंतर हुसेन धोक्याबाहेर आला. जीवदान मिळाले. पंरतु पुढील जीवन जगण्यासाठी पर्याय काय, असा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला. याचवेळी प्रशांत चक्करवार यांनी त्याला धीर दिला. यवतमाळचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्याकडे हुसेनला घेवून गेले. माने यांनी या प्रकरणी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. हुसेनची परिस्थिती हालाखीची असून दोन्ही मुलं मामाकडे शिकायला पाठविले आहे. विकत घेतलेल्या बैलाचीही अंगावर उधारी आहे. अशा परिस्थितीत उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. (शहर वार्ताहर)
मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या शेतकऱ्याला जगण्याची चिंता
By admin | Updated: September 10, 2015 03:02 IST