नंदकिशोर बंग - शेंबाळपिंपरीइसापूर धरण परिसराला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्याचा निर्णय शासनाने फिरविला असून आता त्याठिकाणी वन्यजीव अभयारण्याची निर्मिती केली जाणार आहे. यासंदर्भात महसूल व वनविभाग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली असून याठिकाणी वन्यजीवांचे संरक्षण आणि त्यांची पैदास करण्यात येणार आहे. या संदर्भात नुकतीच इसापूर विश्रामगृहावर एका संयुक्त बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून पैनगंगा नदी वाहते. पुसद तालुक्यातील इसापूर येथे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पक्षी अभयारण्य म्हणून शासनाने घोषित केले होते. वन व महसूल विभागाने संयुक्त पाहणी केली. अहवालही पाठविला होता. मात्र या परिसरात पक्ष्यांची संख्या कमी असल्याने आता याठिकाणी वन्यजीव अभयारण्य म्हणून हा परिसर विकसित करण्यात येणार आहे. पुसद तालुक्यातील राखीव वनक्षेत्रातील २०८६.७४ हेक्टर जमीन तर हिंगोली वनविभागातील ४३९.५५ अशी एकूण २९२३.२८५ हेक्टर जमीन जलसंपदा विभागाने ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पासाठी संपादित केली आहे. ६३८.३४ हेक्टरचे क्षेत्र वनविभागाचे आणि खासगी वने तर २२०.०६ हेक्टर जमीन वन्यजीव अभयारण्यासाठी संपादित करण्यात येणार आहे. सदर अभयारण्य ३७.८० चौरस किलोमीटर परिसरात राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील नाणंद, जांबनाईक, अनसिंग, गौळ मांजरी, गोपवाडी, सातेफळ, बुटी तर हिंगोली जिल्ह्यातील खानापूर, दुर्ग सावंगी, सावरगाव, टाकळी, वागदरा तर खासगी क्षेत्रातील जांबनाईक, अनसिंग, सुकमी, गौळ मांजरी, पाचफूड, उटी, इसापूर अशा ३३ शेतातील २२०.०६ हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे. या संदर्भात नुकतीच एक संयुक्त बैठक घेण्यात आली. इसापूर विश्रामगृहावर झालेल्या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य ययाती नाईक, पंचायत समिती सदस्य शशीकला चंदेल, प्रेम मेंढे, उपवनसंरक्षक एस.व्ही. आलुरवार, हिंगोलीचे उपविभागीय वन अधिकारी एच.एम. कांबळे, पैनगंगा नगरचे उपअभियंता आनंद शर्मा, जी.एम. राठोड, शेंबाळपिंपरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी शकील अहेमद खान, सदबाराव मोहटे, डॉ. बी.जी. नाईक, महेंद्र मस्के, बाबूराव कांबळे आदी उपस्थित होते. या सभेमध्ये पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत २६ मुद्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच वृक्षतोड, आरा गिरणी उभारणी, प्रदूषण निर्माण करणारे उद्योग, शेतीच्या प्रणालीबद्दल अक्षय ऊर्जेचा स्वतंत्र वापर, हवा आणि वादळाचे प्रदूषण, नैसर्गिक पाणी व द्राव्याचा स्त्राव, घनकचरा, पर्यावरण तंत्रज्ञानाचा वापर आदी मुद्यांवर उपविभागीय वनअधिकारी एस.आर. दुमारे यांनी माहिती दिली. तसेच ठरावही मंजूर करण्यात आला.
इसापूर धरण येथे आता वन्यजीव अभयारण्य
By admin | Updated: December 29, 2014 23:51 IST