लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हाधिकारी म्हणजे, खांद्यांवर हजारो जबाबदाऱ्यांचे ओझे सांभाळणारी व्यक्ती. याच जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर कधी फवारणीचा पंपही येईल, असे कुणाला वाटले नव्हते. पण हे घडले, यवतमाळ जिल्ह्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पाठीवर पंप घेऊन कपाशीचे पीक फवारले.पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांना दणका दिल्याने चर्चेत आलेले यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी पुन्हा एकदा सर्वसामान्यांचे मन जिंकले. फवारणी करताना काळजी कशी घ्यावी, हे शेतकरी-मजुरांच्या मनावर ठसविण्यासाठी ते स्वत:च भिसनी गावातील शेतात पोहोचले. फवारणी करताना कुणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, हे त्यांनी स्वत: प्रात्यक्षिकातून समजावून सांगितले. फवारणीची किट, मास्क कसा वापरावा ही माहिती त्यांनी दिली. वातानुकूलित कक्षातून लोकांची गाऱ्हाणी ऐकणारा अधिकारी प्रत्यक्ष शेतात येऊन आपल्याला माहिती देतो, हे पाहून भिसनीतील शेतकरीही भारावून गेले होते.
जेव्हा जिल्हाधिकारी करतात फवारणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 21:47 IST