अनाथाचे पुनर्वसन : टाटा समाज विज्ञान संस्थेचा पुढाकार सतीश येटरे - यवतमाळ भंगार चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून पोलिसांनी उचलले. पोलिसी खाक्यात चौकशी सुरू झाली. मात्र निरागस चेहऱ्यावर पोलिसातील माणसांना त्याचे भविष्य दिसले. प्रत्येक प्रश्नाचे चुटूचुटू उत्तरे देणारा हा मुलगा आहे तरी कोण, असा प्रश्न त्यांना पडला. प्रश्नांच्या सरबत्तीत त्या निरागसाचे काळेकुुट्ट आयुष्य पुढे आले. शिक्षणासाठी त्याची धडपड पाहून पोलिसही क्षणभर अचंबित झाले अन् आयुष्याच्या काळवंडलेल्या पहाटे त्या निरागसाला पोलीस ठाण्यानेच प्रकाशाचा मार्ग दाखविला.जगात त्याने पाऊल ठेवले तेव्हा त्याच्या आईने अखेरचा श्वास घेतला. पित्यासोबत यवतमाळच्या रेल्वे स्थानक परिसरातील झोपडपट्टीत तो राहू लागला. काही वर्षानंतर वडिलांनीही या जगाचा निरोप घेतला. भोला दादाराव वाघमारे (१३) या निरागसाच्या माथी अनाथाचा शिक्का लागला. रेल्वे स्थानकच त्याच्या आयुष्याचे प्लॅटफॉर्म झाले. परिसरात फिरून अन्न मागायचे, दोन वेळची भूक भागवायची आणि रात्री रेल्वे स्थानकातच मोकाट कुत्र्यांच्या सानिध्यात झोपायचे, असा त्याचा नित्यक्रम. मरणापूर्वी वडिलांनी त्याच्यासाठी काही केले असेल तर नगरपरिषदेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्राथमिक शाळेत घातले. लहानपणापासूनच भोलाला शिक्षणाची आवड. पोटात अन्न असो वा नसो सकाळी ११ च्या ठोक्याला भोला शाळेत हजर होतो. सहाव्या वर्गात भोला हा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. सुट्या असल्याने रेल्वे स्थानकातच मुक्कामी असतो. अशातच परिसरातील काही उनाड मुले त्याच्या संपर्कात आली. यवतमाळ शहर पोलिसांना या उनाड मुलांवर भंगार चोरीचा संशय होता. या संशयातूनच रविवारी दुपारी त्या मुलांसोबत भोलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच पोलीस ठाण्यात आणून चौकशी सुरू झाली. या वेळी पाणावलेल्या डोळ्याने भोला पोलिसांना गयावया करीत होता. माझा या घटनेशी काहीही संबंध नाही, असे तो सांगत होता. त्याला ओळख विचारताच त्याने आपले नाव सांगून ‘विद्यार्थी’ अशी ओळख दिली. तेव्हा पोलिसांनी वडिलांचे नाव सांग, असा दम भरला. त्यावर भोला म्हणाला, वडिलांचे नाव माहीत आहे, मात्र आता आई आणि वडील दोघेही या जगात नाही. भोलाची ही व्यथा ऐकून पोलिसांमधील माणूस जागा झाला. त्यांनी भोलाचा नित्यक्रम जाणून घेतला. त्याची करुण कहाणी ऐकून पोलीसही क्षणभर अचंबित झाले. आईवडील असूनही अनेक मुले शिकत नाहीत. अनाथ असूनही भोलात शिक्षणाची जिद्द कायम असल्याचे दिसले. पोलीस शिपाई रमेश भिसे यांनी लगेच एका तरुणाच्या माध्यमातून टाटा समाज विज्ञान संस्थेचे रवींद्र राजूरकर आणि प्रशांत पुणेकर यांच्याशी संपर्क केला. त्यांनी तत्काळ तेथे दाखल होऊन भोलाला बालकल्याण मंडळापुढे हजर करण्याची तयारी चालविली. लवकरच बालकल्याण मंडळाच्या माध्यमातून भोलाचे पुनर्वसन केले जाणार आहे. शिवाय शिक्षणाची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. पोलीस ठाण्यात आल्यानंतर अनेकांचे आयुुष्य उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत. मात्र प्रथमच एका संशयिताचे आयुष्य पोलीस ठाण्याच्या पायरीनेच बदलल्याचा अनुभवही या घटनेने आला.
पोलीस ठाण्याने दाखविला प्रकाशाचा मार्ग
By admin | Updated: June 24, 2014 00:05 IST