प्रकाश सातघरे - दिग्रसइंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांचे गावागावात पेव फुटल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्यासाठी या शाळांनी स्कूल बससेवा सुरू केली. मात्र बहुतांश शाळांच्या स्कूल बसला परिवहन विभागाची परवानगीच नाही. सर्व नियम पायदळी तुडवित दिग्रस तालुक्यात सुरू असलेल्या या प्रकाराने शालेय विद्यार्थ्यांचा जीव मात्र धोक्यात आला आहे. दिग्रस तालुक्यातील अनेक मोठ्या गावात सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याचा आरोप करीत अनेक पालकांनी आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे टाकण्याचा कल वाढला आहे. हीच मानसिकता हेरुन अनेकांनी गावागावात खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची दुकानदारी सुरू केली आहे. विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्यासाठी स्कूल बस सेवा देण्याचा सपाटा लावला आहे. घरापासून शाळेपर्यंत विद्यार्थ्यांना सशुल्क नेले जात असल्याने पालकही या शाळांकडे आकर्षित झाले आहे. मात्र या स्कूल बसमध्ये सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना आहे याची कुणीही खातरजमा करीत नाही. दिग्रस परिसरातील हजारो विद्यार्थी दिग्रस शहरासह मोठ्या गावांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत आहे. या शाळांनी विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था केली आहे. सहा ते दहा आसने छोट्या वाहनांवर स्कूल बस असे लिहून विद्यार्थ्यांचा प्रवास घडविला जातो. या वाहनांवर अनेकदा अप्रशिक्षित चालक दिसून येतात. कोणत्याही नियमाचे पालन न करता वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरश: कोंबले जाते. काही वर्षापूर्वी अमरावती येथे एका स्कूल बसचा अपघात झाला होता. चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर परिवहन विभाग खडबडून जागा झाला. अनेक कठोर नियम केले आहे. परंतु या नियमांना धाब्यावर बसवित खुलेआम विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. राज्य शासनाच्या नियमानुसार परिवहन विभागाकडून स्कूल बसला बॅच क्रमांक दिला जातो. परंतु दिग्रस शहरातील अनेक स्कूल बस चालकांकडे बॅच क्रमांक आणि परवाना आढळून येत नाही. स्कूल बसवर अनेकदा शाळेचे नावही नसते. चिमुकल्यांना बसवायचे आणि शाळेत आणायचे असाच प्रकार सुरू आहे. कुणालाही याचे काही सोयरसूतक नाही. या गंभीर बाबीकडे परिवहन विभाग आणि पोलीसही दुर्लक्ष करताना दिसतात.
विनापरवाना स्कूल बस रस्त्यावर
By admin | Updated: October 25, 2014 22:48 IST