वटफळीचे वसतिगृह : नेर न्यायालयाचा आदेश नेर : विद्यार्थ्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वसतिगृहाच्या अध्यक्षांसह चार जणांविरुद्ध नेर न्यायालयाच्या आदेशावरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळच्या अशोकनगरातील सुनील खैरे याच्या खूनप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. वटफळी बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचे अध्यक्ष देवीदास वाघमारे, अधीक्षक सुभाष रमेश खंताडे, स्वयंपाकी माया नामदेव पांडे, शिपाई रमेश नामदेव मेश्राम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने ३ एप्रिल २०१४ रोजी सदर वसतिगृहाचा विद्यार्थी सुनील विजय खैरे (वर्ग ९) याचा रमेश नामदेव मेश्राम आणि माया नामदेव पांडे यांनी संगनमत करून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह व्याहाळी शिवारातील एका विहिरीत टाकून देण्यात आला. प्रकरणी नेर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील कारवाई होत नसल्याने सुनीलची आई ज्योती विजय खैरे यांनी नेर न्यायालयात दाद मागितली. युक्तीवादाअंती न्यायालयाने सदर प्रकरणी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश ३० डिसेंबर २०१६ रोजी नेर पोलिसांना दिला. यावरून भादंविच्या कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माया नामदेव पांडे आणि रमेश नामदेव मेश्राम यांच्यातील अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यानेच सुनीलचा खून करण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू असल्याचे ठाणेदार संजय पुज्जलवार यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
विद्यार्थ्याच्या खुनात दोन वर्षानंतर गुन्हा दाखल
By admin | Updated: January 1, 2017 02:19 IST