संजय राठोड : यवतमाळ बसस्थानकावर मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रमयवतमाळ : मराठी मुळातच गोडवा असलेली भाषा आहे. आज मराठी भाषा दिनानिमित्त प्रत्येकाने दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा उपयोग करून तिच्या दर्जा वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी शनिवारी येथे केले. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या यवतमाळ आगारातर्फे बसस्थानकात ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.विभागीय नियंत्रक रमेश लोखंडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास नांदेकर, संतोष ढवळे, प्रा. किशोर बुटले, विभागीय वाहतूक अधिकारी मुक्तेश्वर जोशी, आगार व्यवस्थापक दीपक इंगळे आदी उपस्थित होते.पालकमंत्री राठोड म्हणाले, प्रत्येक बसस्थानकावर मराठी कवितेचा एक फलक लावण्याचा उपक्रम प्रशंसनीय आहे. यातून मराठी अस्मिता जपली जाणार आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळात आमुलाग्र बदलाचा संकल्प केला आहे. लाल डब्ब्यापासून सुरू झालेली एसटीबस ते शिवशाही ही अत्याधुनिक बस प्रवाशांच्या सेवेत येत आहे. बसचे रंगरूप बदलवून सुरक्षित, आरामदायक, वेगवान प्रवासासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या काळात एअरपोर्टप्रमाणे बसपोर्टची संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रा. किशोर बुटले म्हणाले, शिवाजी महाराजांनी मराठीला राजाश्रय देऊन तिच्या वापराविषयी प्रयत्न केले. आज ज्ञान मिळविण्यासाठी प्रादेशिक भाषेचे महत्त्व मोठे आहे. मातृभाषा ही मनावर परिणाम करणारी असल्यामुळे ती जीवनाचे मूल्य सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. संचालन रमेश दिघाडे यांनी केले. लता दुपारे यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी सुरक्षा अधिकारी जीवन वानखेडे, बसस्थानक प्रमुख विनोद रोहणकर, रमेश उईके, उदय दमाये, गणेश गावंडे, सुरेश कन्नाके, बाळकृष्ण मेश्राम, प्रदीप वानखडे, प्रवीण मिश्रा, राहुल पाढेन, विजय मुळके, काळपांडे, सुशांत इंगळे, धवसे, प्रवीण कुडमेथे, उमेश वैद्यवार, टापरे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
मराठीचा दर्जा वाढीसाठी प्रयत्न गरजेचे
By admin | Updated: February 28, 2016 02:35 IST