पिके करपायला लागली : भरकाड जमिनीची स्थिती गंभीर, पाऊस गेला कुणीकडे ?ंरुपेश उत्तरवार - यवतमाळजिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३३ टक्के पाऊस पडला. तब्बल एक महिन्यापासून पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली. त्यातच उन्हाचा पारा ३४ अंश सेल्सीअस पर्यंत वर चढला आहे. यातून हलक्या जमिनीतील पिके करपण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे जिल्हयातील खरिपाचा हंगाम धोक्यात सापडला आहे. यातून जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत. जिल्हयात यावर्षी आठ लाख ५० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. मात्र अपुऱ्या पावसाने मुरमाड जमिनीवरील अडीच लाख हेक्टरवरचे पीक करपण्यास सुरवात झाली आहे. इतर पिकांनी माना टाकल्या आहेत. कापूस आणि सोयाबीनची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अपुऱ्या पावसाने पिकांची वाढ खुंटली आहे. कापसाच्या पात्या गळत आहेत. तर सोयाबीनचा बार झडण्यास सुरवात झाली आहे. जमीनीचा पोेत हलका असलेल्या भागात उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने पिकांनी माना खाली टाकल्या आहेत. पिके वाढण्याच्या सुमारास पिकांनी माना खाली टाकल्याने शेतकरी पूर्णत: खचला आहे. शेतशिवारात जनावरे तर चारावे लागणार नाही ना, अशी परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे. काही भागात उशीरा पाऊस दाखल झाला. नंतर त्या ठिकाणी पाण्याचा थेंबही बरसला नाही. या ठिकाणची पिके जमिनीच्या वर उगवले. त्यानंतर ही पिके कोमजन्यास सुरवात झाली. या ठिकाणी पिके हाती येणार किंवा नाही अशी भयावह परिस्थीती निर्माण झाली आहे. ज्वारी, मुग आणि उडीदाची परिस्थिती चिंताजनक आहे. या पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग आला आहे. पिकांवर औषधी फवारायची म्हटले तर जमिनीत ओलावा असावा लागतो. यानंतरही काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भारी औषधांची फवारणी केली. त्याचा परिणाम पिकांवर झाला. पिके पिवळी पडायला लागली. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
उभ्या शेतात आली बैल चारण्याची वेळ
By admin | Updated: August 20, 2014 23:48 IST