पुसद : पूर्वीच्या काळी ज्वारीची मळणी करण्यासाठी बैलांचा वापर केल्या जात असे. यंत्राचा वापर केवळ कारखान्यातच होत होता. पण अलीकडे काळ बदलला असून आधुनिक काळात हळूहळू शेतीत यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आता धान्य मळणीची कामे शेतात जोरात सुरू असून शेतातील खळ््याची जागा मळणी यंत्राने घेतली आहे. मजुरांच्या हातांना मात्र कामे राहिले नाहीत.पूर्वीपासून विदर्भात ज्वारीचे पीक शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. पूर्वी ज्वारीची मळणी बैलांच्या साहाय्याने होत होती. या पद्धतीमध्ये बैलांच्या खुरांच्या साहाय्याने कणसे मळली जायची. त्यासाठी शेतकऱ्यांना बराच कालावधी लागायचा. पण आता काळ बदलला आहे. आधुनिक काळात आता सर्व धानरू पिकांची मळणी थ्रेशर मशीनव्दारे होत असून, थ्रेशर मशीनला आता शेतीत अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. थे्रशर मशीनच्या वापरामुळे खेड्यातील सुशिक्षित बेरोजगारांनासुद्धा एकीकडे व्यवसाय प्राप्त झाला आहे तर दुसरीकडे वाढत्या यांत्रिकीकरणामुळे मजुरांच्या हातांना काम मिळेनासे झाले आहे. शेतकरी आता बरीचशी कामे ट्रॅक्टरच्याच सहाय्याने करताना दिसतात. ट्रॅक्टरमुळे कमी वेळात शेतीच्या मशागतीची कामे व्यवस्थित व सुलभ हाताना दिसतात. तसेच ट्रॅक्टरव्दारे मळणी यंत्रेसुद्धा चालविली जातात. ग्रामीण भागातील पात्र व सुशिक्षित बेरोजगारांना ट्रॅक्टर व मळणी यंत्र विकत घेण्यासाठी शासनाने सबसिडीवर निधी उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातील बेकारीवर काही प्रमाणात अंकुश लावता येईल व तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. शासनाने कर्ज उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुलभ व सुटसुटीत करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
खळ्यांची जागा घेतली मळणी यंत्राने
By admin | Updated: November 17, 2014 23:02 IST