आगार प्रमुखाला नोटीस : उमरखेडचे १२५ कर्मचारी हैराण उमरखेड : मतदानानंतर मतदान यंत्र घेऊन उमरखेडकडे निघालेल्या तीन एसटी बससे गुरूवारी रात्री नादुरूस्त झाल्या. त्यामुळे निवडणूक कर्तव्यावरील १२५ कर्मचारी हैरान झाले तर मतदान यंत्र तहसील कार्यालयात पोहोचण्यास मध्यरात्र उलटली. याप्रकरणी निवडणूक विभागाने एसटी आगार प्रमुखाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उमरखेड तालुक्यातील मतदान यंत्र तहसील कार्यालयात आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून बसेस किरायाने घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी निंगणूरवरून मतदान यंत्र घेऊन निघालेल्या बसचे इंजीन खराब झाले. त्यावेळी ती रस्त्याच थांबली. दराटी येथून निघालेली बस घनदाट जंगलात पंक्चर झाल्याने दोन तास एकाच ठिकाणी उभी होती. तर तिसरी बस गाढी बोरीवरून निघाली असता एका नाल्यात फसली. इतर वाहनाच्या मदतीने ती बाहेर काढावी लागली. या सर्व प्रकारात बसमधील १२५ कर्मचारी अडकून पडले होते. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे खासगी वाहने व पोलिस बंदोबस्त रवाना केला. त्यानंतर रात्री १.३० वाजताच्या सुमारास मतदानयंत्र तहसील कार्यालयात पोहोचले. याप्रकरणी प्रशासनाने आगारप्रमुख मंगेश पांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. (शहर प्रतिनिधी)
निवडणूक कर्तव्यावरील तीन बसेस नादुरूस्त
By admin | Updated: February 18, 2017 00:10 IST