सुरेंद्र राऊतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटीच्या इमारतीत कोविड हॉस्पिटल सुरू आहे. याशिवाय आयसोलेशन वाॅर्ड, सारी रुग्णांचा वाॅर्ड या सर्वच ठिकाणी ऑक्सिजनची गरज रुग्णांना भासत आहे. दिवसाला एक हजार १४० ऑक्सिजन सिलिंडर लागत आहे. त्यासाठी ५०० कनेक्शन व दोन ऑक्सिजन सेंटर उभारण्यात आले आहे. ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत इतर जिल्ह्यांमध्ये सातत्याने तक्रारी आहेत. गेल्या वर्षभरापासून यवतमाळच्या कोविड रुग्णालयात मागणीप्रमाणे ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा सुरू आहे. सध्या १७ रुग्ण सीपॅकवर तर २१९ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. याशिवाय इतर आजारांच्या रुग्णांनाही ऑक्सिजनची गरज भासते. सर्वसाधारण रुग्णांचा अतिदक्षता उपचार कक्ष, अपघात कक्ष येथे केव्हाही ऑक्सिजनचे गरज भासते. ही सर्व गरज नियंत्रित करण्यासाठी दोन ऑक्सिजन सेंटर उभारण्यात आले आहे. तर ५०० कनेक्शन आहे. एका वेळी ५०० सिलिंडर लावले जातात. तीन शिफ्टमध्ये हे सिलिंडर बदलावावे लागतात. रुग्णांची गरज लक्षात घेऊन ऑक्सिजनचा प्रवाह कमी किंवा जास्त ठेवावा लागतो. कोविडच्या उपचारात ऑक्सिजन हे सर्वात मोठे औषध मानले जाते. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी स्वतंत्र ऑक्सिजन समितीच स्थापन केली आहे. ही समिती पुरवठा आणि वाॅर्डनिहाय त्याचे नियोजन याची देखरेख करते. पूर्वी दिवसाला ५०० ते ६०० ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. आता ही मागणी दुप्पट झाली आहे. सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीत संपूर्ण कोविड रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. चार मजल्यापर्यंत ऑक्सिजन पोहोचविण्यासाठी येथे इंटर नॅशनल ओटू कंट्रोल पॅनल बसविले आहे. ही प्रणाली अमेरिकेतून आयात केली असून ऑटोमॅटिक कंट्रोल पॅनलच्या माध्यमातून कार्यान्वित आहे. सप्टेंबर २०२० पासून सातत्याने हे ओटू सेंटर सुरू आहे. त्यात सेकंदाचाही खंड पडलेला नाही. २७ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता या प्रणालीत बिघाड झाल्याची बाब निदर्शनास आली. ऑक्सिजन समितीच्या सर्व सदस्यांनी स्थानिक तंत्रज्ञांना सोबत घेऊन ऑक्सिजन प्रवाह खंडित होऊ न देता रात्रभर दुरुस्तीचे काम केले. सकाळी ४ वाजेपर्यंत ही दुरुस्ती चालली. नंतर दिल्लीवरून तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.