यवतमाळ : राज्य शासनाने ग्रामीण आरोग्याची सेवा अधिक बळकट करण्यासाठी ‘गाव तिथे डॉक्टर’ योजना अमलात आणली. मात्र अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ही योजना पूर्णत: अपयशी ठरली आहे. ग्रामीण भागात जाऊन आजही डॉक्टर वर्ग सेवा देण्यास तयार नाही. शासनाने ‘गाव तिथे डॉक्टर’ योजनेला केंद्रस्थानी ठेऊन विविध कॅम्प, औषधी खरेदीसारखे उपक्रम राबविले.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर अनेक डॉक्टर केवळ १५ दिवसच काम करतात. एकाठिकाणी असलेले वैद्यकीय अधिकारी आपली ड्युटी वाटून घेतात. काही आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. गाव तिथे डॉक्टर योजने अंतर्गत नियोजित गावांना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दोन वेळा भेट देणे आवश्यक आहे. गावात जाऊन उपचारात्मक व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. गरज भासल्यास रुग्णांना संदर्भ सेवा देणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजने अंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गाव भेटीचे वेळापत्रक हे सर्व कार्यालय, ग्रामपंचायत, अंगणवाडी व शाळेत प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. हाच कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्रात लावणेसुद्धा आवश्यक आहे. ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, महिला बचत गटातील सदस्य यांनाही डॉक्टरांच्या वेळापत्रकाची माहिती असणे आवश्यक आहे. या मागचा हाच हेतु आहे की डॉक्टर गावात आल्यानंतर गावातील रुग्णांना आरोग्य तपासणीसाठी त्यांच्याकडे जाता येते. गाव भेटीत जन्म-मृत्यूच्या नोंदी विषयक अभिलेख्यांची तपासणी, पाणीशुद्धीकरण विषयक तपासणी याची पडताळणीही या अधिकाऱ्यांना करायची आहे. मात्र या पद्धतीने कुठेच काम होताना दिसत नाही. आरोग्य अधिकारी केवळ शासनाचे वेतन आणि भत्ते लाटण्यातच धन्यता मानत असल्याचा आरोप सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश देशमुख यांनी केला आहे. यासंदर्भात लवकरच आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
‘गाव तेथे डॉक्टर’ योजना कागदावरच
By admin | Updated: February 22, 2015 02:02 IST