यवतमाळ : कॅन्सरकडे दुर्लक्ष केल्यास आजाराची तीव्रता वाढते. या आजाराचे चार टप्पे आहेत. मात्र ‘झिरो स्टेज’ हासुद्धा एक महत्त्वाचा टप्पा आहे. अर्थात यासाठी नियमित संपूर्ण आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे, असे डॉ. अजय मेहता यांनी सांगितले. निदान झाल्यास कॅन्सरवर तत्काळ नियंत्रण मिळविणे सहज शक्य होते. ‘झिरो स्टेज’मधील कॅन्सर १०० टक्के बरा होतो. कॅन्सरबाबत दक्षता, जनजागृती तेवढीच महत्त्वाची आहे. कॅन्सर हा संसर्गजन्य आजार नाही. कॅन्सरला वयाचे बंधन नाही. तो आबालवृद्धांपैकी कुणालाही होवू शकतो. अनुवांषिकतेनेसुद्धा तो नव्या पिढीच्या शरीरात प्रवेश करू शकतो. वाढत्या वयानुसार कॅन्सरही वाढत जातो. त्यात तंबाखु सेवन करणारे आणि महिलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. मुलींकरिता प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. पूर्वी ती नऊ हजार रुपयात मिळत होती. मात्र आता सरकारने काही अनुदान दिल्याने त्याची किंमत तीन हजार रुपये (तीन इंजेक्शन) झाली आहे. मात्र ही लस शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाही. पर्यायाने बीपीएलधारकांना ती मोफत अथवा सवलतीने मिळत नाही. कीटकनाशकांच्या अतिवापराचा दुष्परिणाम मानवी शरीरावर होत असून त्यामुळे कॅन्सरच नव्हे तर सर्वच आजार उत्पन्न होत असल्याचे डॉ. मेहता यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी महिला व नागरिकांच्या प्रश्नांना डॉ. मेहता यांनी दिलखुलास उत्तरे देवून त्यांच्या शंकांचे समाधान केले. त्यानंतर रुग्ण तपासणी करण्यात आली. ज्योत्स्ना दर्डा यांना आदरांजली अर्पण करून शिबिराला सुरूवात झाली. प्रास्ताविक जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अजय कोलारकर यांनी केले. विजय दर्डा यांनी आपल्या भाषणात डॉ. संजय दर्डा व डॉ. अनिता दर्डा प्रत्येक रविवारी बुटीबोरी येथे रुग्णांची आरोग्य तपासणी करीत असल्याचे आवर्जून सांगितले. (शहर वार्ताहर)
कॅन्सर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: March 19, 2015 02:06 IST