सात निविदा मंजूर : अनेक सदस्य सभागृहात उशिरा पोहोचले यवतमाळ : जिल्हा परिषदेची शनिवारी झालेली विशेष सर्वसाधारण सभा अवघ्या १५ मिनीटांत तीन विषयांना मंजुरी देऊन गुंडाळण्यात आली. अनेक सदस्य सभा सुरू होईपर्यंत सभागृहातही पोहोचले नव्हते. बांधकाम विभागाची निकड लक्षात घेऊन अध्यक्षांनी शनिवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलविली होती. राष्ट्रगीताने सभेला सुरूवात होताच लगेच बांधकाम विभाग क्रमांक एकच्या पात्र निविदांना मंजुरी देणे, वणी, मारेगाव, पांढरकवडा येथील जुन्या वास्तू निर्लेखीत करणे आणि वणी पंचायत समितीमधील पुनवट येथे आठवडी व गुरांचा बाजार भरविण्यास मंजुरी देण्याचे विषय ठेवण्यात आले. लगेच या विषयांना मंजुरी बहाल करण्यात आली. त्यानंतर तत्काळ सभा गुंडाळण्यात आली. तोपर्यंत अनेक सदस्य सागृहात पोहोचले नव्हते. काही सदस्य धावपळ करीत शेवटच्या क्षणी पोहोचले. वणी, उमरेखड, झरी, महागावसारख्या तालुक्यातून येणाऱ्या काही सदस्यांनी सभा बोलविलीच कशाला, असा प्रश्न नंतर उपस्थित केला. बांधकाम विभाग क्रमांक एकने २२ कामांच्या ई-निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. त्यापैकी प्राप्त होणाऱ्या पात्र निविदांना मंजुरी बहाल करण्यासाठी विशेष सभा बोलविण्याची विनंती केली होती. सभेत २२ कामांपैकी सात कामांच्या पात्र निविदा मंजुरीसाठी ठेवण्यात आल्या. त्यात ५०५४-४०२ अंतर्गत आदिवासी जनजाती क्षेत्रातील लेखा शीर्षातील निविदांचा समावेश आहे. यात मोऱ्या व पुलांचे बांधकाम, रस्ता बांधकाम, रस्त्याची सुधारणा आदी कामे अंतर्भूत आहेत. सभेत वणी, मारेगाव आणि पांढरकवडा येथील नवीन प्रशासकीय वास्तूसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जुन्या वास्तू निर्लेखीत करणे व पाडण्यालाही मंजुरी प्रदान करण्यात आली. याशिवाय वणी तालुक्यातील पुनवट येथे दर बुधवारी आठवडी बाजार व गुरांचा बाजार भरविण्यास परवानगी देण्यात आली. नंतर लगेच सभा गुंडाळण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेची विशेष सभा १५ मिनिटात गुंडाळली
By admin | Updated: January 1, 2017 02:20 IST