ज्ञानेश्वर मुंदे ल्ल यवतमाळप्रसंग पहिला : तीन दिवसांपासून तहसीलच्या येरझारा मारत आहो. साहेब भेटत नाही. एका कामासाठी किती दिवस मजुरी बुडवावी? असे तहसील परिसरात खेड्यातून आलेला एक मध्यमवर्गीय व्यक्ती बोलत होता. प्रसंग दुसरा : साहेब तीन दिवसांच्या सलग सुट्या, तुमची मजा आहे, असे एका बँक कॅशिअरला त्याचा मित्र म्हणत होता. कशाची मजा? आता सोमवारी गेल्यावर पहा कशा ग्राहकांच्या शिव्या खाव्या लागतात. गर्दीने पाय ठेवायलाही जागा राहत नाही. सलग सहा दिवस काम झाले तर कामाचा ताणही येत नाही, असे तो म्हणाला. राज्य शासन आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करणार आहे. कार्यक्षमतेत वाढ आणि कामाचा ताण कमी करण्यावरचा हा उपाय आहे. मात्र अपवाद वगळता बहुतांश कर्मचारी सहा दिवसांच्या आठवड्यात निर्धारित वेळात आपले काम करतात काय ? ते आपल्या खुर्चीत दिवसभर बसलेले असतात काय? असा सर्वसामान्यांना पडणारा साधा प्रश्न आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयात कामाच्या निमित्ताने कुणीही गेल्यास दुपारी १२.३० वाजताच अर्ध्याअधिक खुर्च्या रिकाम्या दिसतात. कार्यालयाजवळील चहाटपऱ्या कर्मचाऱ्यांनी फुललेल्या असतात. ‘साहेबांची’ वाट पाहून कामासाठी आलेला व्यक्ती कंटाळून जातो. परंतु, साहेब ‘लंच’ झाल्याशिवाय भेटतच नाही. अशी मानसिकता झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सहा दिवसांचा आठवडाही दोन दिवसांचाच असतो. तो कार्यालयात किती वेळ आहे यापेक्षा तो किती वेळ काम करतो हे महत्वाचे ठरते. परंतु बहुतांश कर्मचारी काम घेऊन येणाऱ्याला केवळ ‘टोलवाटोलवी’ करण्यातच धन्यता मानतात. एका कामासाठी आठ-आठ दिवस उंबरठे झिजविण्याचे चित्र नवे नाही. आता त्यात पाच दिवसाचा आठवडा झाल्यास यात आणखी भर पडू शकते. तसेही कर्मचारी वेळेवर आले तरी कामाला सुरुवात मात्र उशिराच करतात. हा नेहमीचा अनुभव आहे आणि सायंकाळी ४ वाजले की त्यांना ‘वेध’ लागतात. अशी मानसिकता झालेल्या अवस्थेत पाच दिवसांचा आठवडा करून त्यांच्याकडून सात तास ४५ मिनिटे काम करून घेणे शक्य आहे काय? देहाने जरी कर्मचारी कार्यालयात असला तरी मनाने असतोच कुठे? याला अनेक कर्मचारी अपवादही आहे. रात्री उशिरापर्यंत कार्यालयात आपले काम निपटविणारे कर्मचारी दिसतात. त्यांची काम करण्याची वृत्ती २४ बाय ७ असते. परंतु ज्यांना कामचुकारपणाची सवयच झाली ते दोन दिवस ‘रिफ्रेश’ झाल्यानंतर २४ बाय ५ मध्ये काम करतीलच याची खात्री देणार तरी कोण? पाच दिवसाच्या आठवड्यात शुक्रवारी अथवा सोमवारी सुटी आली तर कर्मचाऱ्यांचं चांगभलंच. शासकीय कार्यालयासाठी ते ठिकही आहे. परंतु बँकेसारख्या ठिकाणी आता पाच दिवसाचा आठवडा झाला. गत आठवड्यातच शुक्रवारी सुटी आली. शनिवार-रविवार दोन दिवस सुटीचे होते. अशा स्थितीत सोमवारी या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसाचा ताण साक्षात अनुभवला अन् लोकांच्या शिव्याही. म्हणे पाच दिवसांचा आठवडा. सेवेच्या हमीचे काय?४शासकीय कार्यालयात नागरिकांची कामे निर्धारित वेळेतच व्हावी, यासाठी सेवा हमी विधेयक पारित करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामात सातत्य ठेवण्याशिवाय पर्याय नाही. त्यातच अनेक कार्यालयांतील पदे रिक्त आहेत. अशावेळी पाच दिवसांचा आठवडा झाल्यास, कामे रेंगाळण्याचीच अधिक शक्यता आहे.
म्हणे, सात तास ४५ मिनिटे कामकाज !
By admin | Updated: September 30, 2015 06:09 IST