मारेगाव : येथील ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने हे रुग्णालयच आता आजारी पडण्याच्या मार्गावर आहे. रुग्णालयात गरीब व ग्रामीण रुग्णांना वाईट वागणूक मिळत असल्याने रुग्णांमध्ये नाराजी दिसून येत आहे.या तालुकास्थळी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे. तथापि, आजमितीस प्रत्यक्षात रुग्णालयात केवळ १५ खाटाच दिसून येत आहे. या रूग्णालयाच्या बाह्य व अंतर्गत परिसरात प्रचंड घाण साचून आहे. कागदावरील ३० खाटांच्या या रूग्णालयात एकच शौचालय आहे. त्याची आता अत्यंत दुरवस्था झाली आहे. शौचालयात पाण्याची सुविधा नाही. नळाच्या सिंटेक्स टाकी एक वर्षापासून फुटलेल्या आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी कोणतीही सुविधा नाही. ग्रामपंचायतीच्या नळ योजनेतून ग्रामीण रूग्णालयाला कधीतरी पाणी पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे या नळयोजनेचा पाईप रूग्णालयाच्या दारासमोरच फुटला असल्याने नळाला पाणी आल्यानंतर त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. त्यातूनच रुग्णांना वाट काढावी लागते. गेल्या पाच वर्षांपासून या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. रूग्णांना तासन्तास डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागते. रूग्णांना केवळ रेफर करण्यावरच भर दिला जातो. डॉक्टरांमध्ये उपचार करण्याची उदासीनता दिसून येते. औषध साठा भरपूर असतानाही वितरणात दिरंगाई होत आहे.या रुग्णालयात भरती रूग्णांना अनेकदा सकाळी १० वाजतापर्यंत नास्ता, चहा, जेवणही मिळत नाही. येथे केवळ डॉ़ क़वि़ गोटे हे एकमेव डॉक्टर कार्यरत असल्याने रात्री आणि दिवसा त्यांनाच रूग्ण तपासावे लागतात़ त्यात त्यांची प्रचंड धांदल उडते. रूग्णांच्या नावाच्या चिठ्ठ्या फाडायला कर्मचारी नसल्याने सहाय्यक लिपीकालाच ते काम करावे लागते. औषध वाटपासाठी कर्मचारी नसल्याने परिचारिकांनाच औषधी वाटावी लागते. बरेचशी यंत्रेही निकामी झाली आहे. विष काढण्याचे यंत्र बंद असल्यामुळे डॉक्टर नळी टाकून विष काढण्याचा प्रयत्न करतात़ सुविधांच्या नावाने सर्वत्र भयावह अवस्था आहे. (शहर प्रतिनिधी)
ग्रामीण रुग्णालयच आजारी
By admin | Updated: June 30, 2014 00:09 IST