राळेगाव : शहरात डुकरांची संख्या गेली दोन वर्षात कमालीची वाढली आहे. त्यातच आता शहरातील कुत्र्यांवर त्वचेवरील केस गळण्याची लागण सर्वत्र झालेली स्पष्ट दिसत आहे. या परिणामी शहरात स्वाईन फ्लूची साथ केव्हाही पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. ही रोगराई झाल्यानंतर रुग्णांचे निदान करणे, उपचार करणे सर्वसामान्य, गोरगरिबच नव्हे तर सर्वांनाच अशक्य आहे. त्यामुळे रोग होण्यापूर्वीच त्याचा प्रतिबंध करावा, अशी मागणी आहे. डुक्कर व कुत्र्यांना मारणे किंवा पकडून जंगलात नेवून सोडणे असा उपाय करण्याची शहरवासीयांची मागणी आहे. ग्रामपंचायतीकडे गेली दोन वर्षात अनेकदा जागरूक नागरिकांनी या संदर्भात लेखी, तोंडी मागणी केली आहे. पण दरवेळी वेगवेगळ्या पळवाटा शोधून या महत्त्वपूर्ण मोहिमेकडे दुर्लक्ष केले जात आहे.खरूज, त्वचारोग झालेली कुत्री विविध कार्यालयात, नागरिकांच्या घरात हिंदडतात. परिणामी नागरिकांना खरूज वा तत्सम त्वचारोगाचा सामना करावा लागू शकतो. येथील शिक्षण विभागात काही कुत्री शिरल्यानंतर दिवसभर कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. कीटकनाशक औषधांच्या फवारणीनंतरच कार्यालय सुरू करण्यात आले होते. अशी जागरूकता सर्वांमध्येच नाही आणि ही बाब शक्यही नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने या महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालून पुढील दुष्परिणामांना वेळीच आळा घालण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
स्वाईन फ्लूचा धोका वाढला
By admin | Updated: March 21, 2015 02:15 IST