पुसद : दहावीच्या परीक्षेत दिग्रस तालुक्याचा निकाल ८९.०९ टक्के लागला असून त्याखालोखाल महागाव तालुक्याचा निकाल ८६.७६ टक्के आहे. पुसदमध्ये ८, दिग्रसमध्ये ७, महागावात २ तर उमरखेड तालुक्यातील दोन शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची सायबर कॅफेवर चांगलीच गर्दी झाली होती. निकालात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेला दिग्रस तालुक्यातील दोन हजार ३१० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी दोन हजार ५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.०९ टक्के आहे. हरसूल येथील दिग्रस विभागीय एसपीएम हायस्कूल, कलगाव येथील दिग्रस विभागीय एसपीएम हायस्कूल, दिग्रस येथील नारायणराव कोषटवार इंग्लिश हायस्कूल, गुरुकूल इंग्लिश स्कूल, विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल, उत्तमराव देशमुख आदिवासी आश्रमशाळा आणि शंकरराव राठोड आश्रमशाळा रुई तलाव यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. पुसद तालुक्यातून चार हजार १२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी चार हजार १९७ म्हणजे ८७.२० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुसद येथील सेंट मेरी स्कूल, जे इंग्लिश स्कूल, धनसळ येथील गंगाबाई नाईक विद्यालय, शिळोणा येथील सुधाकरराव नाईक विद्यालय, एरंडा येथील मनोहरराव नाईक विद्यालय, पुसद येथील नवजिवन ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, जांबबाजार येथील गुणवंतराव देशमुख विद्यालय, पुसद येथील हाजी अख्तरनगर परिषद उर्दू विद्यालय या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.उमरखेड तालुक्यातून तीन हजार २७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी दोन हजार ६०८ म्हणजे ८९.५४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उमरखेड येथील युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल आणि कुपटी येथील माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. महागाव तालुक्यातून दोन हजार ६४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी एक हजार ७९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णततेची टक्केवारी ८६.७६ आहे. काळी येथील एस. नाईक उर्दू विद्यालय आणि खडका येथील बाबासाहेब नाईक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. निकालासाठी सायबर कॅफेमध्ये गर्दी झाली होती. (लोकमत चमू)
दिग्रस तालुक्याचा निकाल ८९.०९ टक्के
By admin | Updated: June 18, 2014 00:27 IST