१०४ कामांना मंजुरी : पहिल्या टप्प्यात १६ कोटी ५५ लाखांची कामे होणार यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियांनातर्गत जिल्ह्यात नदी पुनर्जीवन कार्यक्रम राबविण्यासंदर्भात नदी पुनर्जीवन कार्यक्रमास शासनाने मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात दारव्हा, दिग्रस, घाटंजी, कळंब या तालुक्यांतील नद्यांचे पुनर्जीवन करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत १०४ कामांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी १६ कोटी ५५ लक्ष रूपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. शासनाने १७ डिसेंबरच्या ओदशान्वये, जिल्हाधिकाऱ्यांना मान्यता दिलेल्या प्रस्तावाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात जलयुक्त शिवारच्या कामांमधून जलसमृद्धी आली. त्यामुळे हिवाळ्यात किवा उन्हाळ्याच्या सुरवातीलाच कोरड्या पडणाऱ्या नदींचे जलयुक्तच्या कामांमधून पुनर्जीवन करण्याची कल्पना पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनासमोर ठेवली. प्रशासनामार्फत तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. त्याची दखल घेत नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदी पुनर्जीवन योजनेबाबत जलसंधारण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील नदी पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत प्राप्त प्रस्तावावर चर्चा होऊन दारव्हा, दिग्रस, घाटंजी, कळंब तालुक्यातील नदी, नाला, ओढानिहाय नवीन सिमेंट नालाबांध कार्यक्रमास मान्यता देण्यात आली. त्यानुसार, दारव्हा तालुक्यातील कुपटी व डुंगरी नदीवर अनुक्रमे १५ व २१ कामांना, दिग्रस तालुक्यातील धावंडा नदीवर ३९ कामांना, घाटंजी तालुक्यातील झुली ते खुनी नदीवर २३ कामांना आणि कळंब तालुक्यातील चक्रावती नदीवर ६ अशा एकूण १०४ कामांना मंजुरी देण्यात आली. अशाप्रकारे १०४ कामांसाठी १६ कोटी ५५ लक्ष ४ हजार रूपयांच्या निधीसही मान्यता देण्यात आली. यासंदर्भात शासनाच्या निर्देशानुसार प्रक्रिया पूर्ण करून ही कामे सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या ओदशात देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी लोकवर्गणी, श्रमदान व लोकसहभागातून जलयुक्त शिवारची कामे होत आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने नदी पुनर्जीवन कार्यक्रम सुरू केल्याने अनेक गावातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया यासंदर्भात पालकमंत्र्यांनी दिली. जलयुक्त शिवारमुळे पावसाचे पाणी अडल्याने असंख्य शेतकऱ्यांना सिंचनाची मोठी सुविधा झाली आहे. नदी पुनर्जीवन कार्यक्रमामुळे या सिंचन क्षेत्राता मोठी वाढ होणार आहे. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्यांसाठी जलयुक्त शिवार अभियानातून पुनर्जीवन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील नद्यांचे पुनरूज्जीवन
By admin | Updated: December 28, 2016 00:26 IST