नियमांना तिलांजली : वनविभागाचे दुर्लक्ष दिग्रस : तालुक्यातील वन विभागांतर्गत परवानाप्राप्त आरामशीनवर नियमांना तिलांजली देऊन राजरोस लाकूड कटाई होत आहे. रात्रीतून या ठिकाणी मौल्यवान लाकडांचीही कटाई केली जात असून वन विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. दिग्रस तालुक्यात हजारो हेक्टर वनजमीन आणि जंगल आहे. या जंगलात अनेक प्रकारची वृक्ष आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या बांधावरही सागवानासह इतर वृक्ष आहे. दलालांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून वृक्ष विकत घेतले जातात. त्यानंतर आरामशीनवर पाहिजे त्या पद्धतीने कटाई केली जाते. विशेष म्हणजे, दिवसा आरामशीन चालविण्याचा नियम आहे. सूर्यास्त ते सूर्योदय आरामशीन बंद ठेवावी लागते. परंतु येथील अनेक आरामशीनवर रातोरात लाकूड कापले जातात. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी परिसरातील शेकडो वृक्ष नष्ट होत आहे. एकीकडे शासन वृक्षलागवडीसाठी लाखो रुपये खर्च करीत आहे, तर दुसरीकडे वृक्षांची कत्तल होत आहे. शेतकऱ्यांच्या नावावरील वृक्षही कापले जात आहे. आरामशीन चालकांवर वन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
आरामशीनवर राजरोस कटाई
By admin | Updated: January 18, 2017 00:09 IST