पुसद : आपल्या न्याय व प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील अपंग महिला, पुरुष, विधवा व निराधारांनी सोमवारी काढलेल्या धडक मोर्चाने पुसद शहर दणाणून गेले. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू यांना दिले. तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील मजूर अपंग बहुद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने येथील शिवाजी चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गाने जावून मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. अपंगांना न्याय मिळालाच पाहिजे, घरकूल मिळालेच पाहिजे, मानधन वाढविले पाहिजे अशा घोषणांनी यावेळी शहर दणाणून गेले होते. सर्व अपंगांची नावे दारिद्र्यरेषेखाली समाविष्ट करावी, त्यांच्या कुटुंबीयांना अंत्योदय, रेशनकार्ड योजनेचा लाभ देण्यात यावा, अपंगांचे मानधन ६०० रुपयांवरून दोन हजार रुपये प्रतिमाह करावे, श्रावणबाळ, इंदिरा गांधी व संजय गांधी निराधार योजनेची ६५ वर्षे वयाची अट कमी करून ६० वर्षे करण्यात यावी, बीज भांडवल कर्जात ५० टक्के अनुदान देण्यात यावे, प्रत्येक अपंगाला घरकूल देण्यात यावे, प्रमाणपत्र एक दिवसात मिळावे, विद्युत मीटर व वीज बिलामध्ये ५० टक्के सवलत देण्यात यावी आदी प्रमुख दहा मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.या मोर्चात पुसद शहरासह तालुक्यातील शेंबाळपिंपरी, ईस्तापूर, सावरगाव, माणिकवाडा, इनापूर, शिवाजीनगर, भोजला, दूधगिरी तांडा, गौळ बु., हिवळणी, बुटी, बोरी, फुलवाडी आदी अनेक गावातील शेकडो अपंग महिला, पुरुष सहभागी झाले होते. निवेदन देताना उत्तम कांबळे, प्रभाकर मनवर, लक्ष्मण लिंबोळे, शेख रसिद शेख अली, लोभाजी काळे, गोपीचंद पाईकराव, रमेश मनवर, शंकर रणखांब, चंद्रमणी मनवर, संतोष नरहरी, दीपक मनवर, मुकिंदा लष्कर, डॉ.सूर्यकांत पद्मावार, हरिश गुरुवाणी, छगन चव्हाण आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
अपंगांच्या धडक मोर्चाने पुसद शहर दणाणले
By admin | Updated: December 29, 2014 23:52 IST