पुसद बांधकाम विभाग : अभियंत्यांपुढे चौकशीचा पेच, कामे उघडे पाडण्याचा प्रयत्न पुसद : पुसद विभागातील हॉटमिक्स व लहान कंत्राटदारांनी एकमेकांना उघडे पाडण्यासाठी दंड थोपटले आहे. एका गटाने दुसऱ्याची तक्रार केली आहे. तर या तक्रारीची चौकशी झाल्यास बड्या कंत्राटदारांच्या कामाची गुणवत्ता तपासणीसाठी दबाव वाढवू असा इशारा लहान कंत्राटदारांनी दिला आहे. त्यामुळे नेमकी कुणाची चौकशी करावी आणि या वादातून कसा मध्यम मार्ग काढावा असा पेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या येथील अभियंत्यांपुढे निर्माण झाला आहे. पुसद सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रेकॉर्डवर प्रमुख १९ हॉटमिक्स कंत्राटदारांची नोंद आहे. त्यापैकी चार ते पाच जणांनी अन्य १४ कंत्राटदारांची कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार केली आहे. त्यात या कंत्राटदारांचा प्लॅन्ट परिपूर्ण नसून ते तेथील व्हायब्रेटर, रोलर, सेंसर पेवर, संगणक युनिट आदी साहित्य कागदावरच दाखवित असल्याचे त्यात नमूद केले आहे. मोठे कंत्राटदार सीआरएफची कामे घेतात, त्यांनी आता सुमारे एक कोटी रुपयापर्यंतच्या लहान कामांमध्येही वाटा मागितला आहे. त्यामुळे लहान कंत्राटदार संतप्त आहेत. लहान कंत्राटदारांकडे प्लॅन्ट व साहित्य कागदोपत्रीच असल्याने या मोठ्या कंत्राटदारांनी लहानांच्या कामात हिस्सा मागितला आहे. दरवर्षी या प्लॅन्टच्या तपासणीसाठी अमरावतीवरून गुणवत्ता नियंत्रण विभागाची चमू येते. मात्र या चमूच्या दौऱ्यापूर्वी त्या-त्या प्लॅन्टवर साहित्य उपलब्ध करून दिले जाते. या बाबींपासून ही चमूही अनभिज्ञ नसते. म्हणून ही चमू वर-वर तपासणी करून ‘खूश’ होऊन निघून जाते. मात्र आता कंत्राटदारांचे दोन गट पडल्याने व त्यांनी एकमेकांना पाहून घेण्याची भाषा वापरल्याने हे कागदावर दाखविले जाणारे प्लॅन्ट व साहित्य अडचणीत आले आहे. तुमच्याजवळ प्लॅन्ट नाही व साहित्य नाही म्हणून तुम्हाला कामे मिळू नये, अशी भूमिका घेत मोठ्या कंत्राटदारांनी लहान कंत्राटदारांना आव्हान दिले आहे. तशी तक्रार करुन चौकशीची मागणी केली गेली आहे. तर लहान कंत्राटदारांनीसुद्धा अभियंत्यांना भेटून आम्हाला कामे न मिळाल्यास गेली अनेक वर्ष बड्या कंत्राटदारांनी कशी बोगस कामे केली, त्यांच्या साईड पट्ट्यांची कामे कशी झाली, त्यासाठी कोठून गौण खनिज आले याचा पर्दाफाश करू असा इशारा दिला आहे. त्यामुळे नेमकी कुणाची बाजू घ्यावी आणि काय चौकशी करावी, असा पेच कार्यकारी अभियंत्यांपुढे निर्माण झाला आहे. यातील बड्या कंत्राटदारांना उपअभियंत्यांचे अभय लाभत असल्याचेही बोलले जाते. कंत्राटदारांमधील ही भांडणे मिटविण्याचा प्रयत्न होतो आहे, ही भांडणे न थांबल्यास दोनही गट एकमेकांना उघडे पाडण्याची संधी सोडणार नाही, त्यातून वेगळेच ‘वास्तव’ जनतेपुढे येण्याची आणि त्यात कंत्राटदाराच नव्हे तर विद्यमान आणि गेल्या काही वर्षातील बांधकाम अभियंतेही अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कंत्राटदारांनी एकमेकांविरूद्ध थोपटले दंड
By admin | Updated: January 11, 2017 00:33 IST