नीलम गोर्हे यांची झरीला भेट : शासकीय योजनांचा लाभच मिळाला नाहीझरीजामणी : झरीजामणी तालुक्यातील कुमारी मातांच्या पुनर्वसनाची समस्या अत्यंत गंभीर असून त्यांना शासकीय योजनांचा कोणताच लाभही मिळाला नसल्याचा आरोप शिवसेना नेत्या आमदार नीलम गोर्हे यांनी केला. त्यांनी गुरूवारी झरीजामणी येथे कुमारी मातांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या.झरीजामणी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात कुमारी माता आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गुरूवारी निलम गोर्हे थेट झरीजामणी येथे दाखल झाल्या. त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे उपस्थित होते. दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्या येथील पंचायत समिती कार्यालयात धडकल्या. यावेळी त्यांच्यासोबत चार कुमारी माता होत्या. प्रथम त्यांनी त्यांच्याशी अर्धा तास बंदद्वार चर्चा केली. त्यानंतर या कुमारी मातांना त्यांनी तुम्ही शाळा शिकल्या का, वाचू-लिहू शकता, बँकेत खाते काढले का, सही करता येते काय, शासनाकडून काय मिळाले आदी विषयांवर चर्चा केली. त्यानंतर गटविकास अधिकारी सुनील तलवारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मडावी यांच्याशी चर्चा केली. कुमारी मातांना प्राधान्याने घरकुल देण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा प्राधान्यक्रमाने लाभ देण्याच्या सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, वणी तालुका प्रमुख गणपत लेडांगे, जिल्हा परिषद सदस्य आशिष गुलसंगे, बंडू चांदेकर आदी उपस्थित होते. यानंतर गोर्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन शासनावर टीकेची झोड उठविली. आघाडी सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप त्यांनी केला. आजपर्यंत शासनाचा कोणताही प्रतिनिधी या कुमारी मातांची विचारपूस करण्यासाठी आला नसल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
कुमारी मातांच्या पुनर्वसनाची समस्या गंभीर
By admin | Updated: May 30, 2014 00:24 IST