प्रकाश पेंधे - बिटरगाव निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट अरण्यात वनौषधीचा बहुमोल खजाना आहे. २७० जातीचे दुर्मिळ वनौषधी या परिसरात असल्याचा दावा आहे. मात्र वनविभाग आणि प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे हा खजाना आजही लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. उलट काही वैधू या जंगलात वनौषधी शोधत फिरताना दिसतात. पैनगंगा नदीच्या तीरावर पैनगंगा अभयारण्य आहे. ३२४.६४ चौरस किलोमीटर परिसरात अभयारण्य पसरलेले आहे. या अभयारण्याचा ८० टक्के भाग यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात येतो. निसर्गरम्य या अभयारण्यात पशू पक्षांसह दुर्मिळ अशी वनौषधी आहे. त्यात गुळवेल, धामणवेल, पिवळवेल, गवतपर्णी, खैर, मार्दन, सूर्या, कदंब, मोह, चारोळी, आवळा, बेहडा, अंजन, चिंच, सालई, हळदबेरा, पांघरा, पळस, टाकळणी, खरबडी, चंद्रज्योती, बाळा, पिंपळ, बिजासाग, गिद्यासाग, चिमनसाग आदी वृक्ष आहेत. निर्गुडा, बोराटी, भारटी, आमटी, रायमुनिया, मराठीकार आदी झुडपी वनौषधी आहे. तर गवत जातीतील तिरकडी, पवना, मारवेल, कुसळी, कोळसन, बीबी, कुंदा या जाती आहे. यासह सुमारे २७० जातीची विविध वनौषधी शेकडो वर्षांपासून या जंगलात आहे. या भागातील वनौषधीचे ज्ञान असलेले आदिवासी आपल्या परंपरागत ज्ञानाचा उपयोग करून उपचार करतात. बहुमूल्य वनौषधीकडे अद्यापपर्यंत वनविभागाचे लक्षच गेले नाही. हा अनमोल खजाना जनतेच्या सेवेत दाखल झाल्यास विविध उपचारावर त्याचा उपयोग होऊ शकतो. ज्यांना वनौषधीची माहिती आहे, अशी मंडळी या जंगलात भटकंती करून वनौषधी गोळा करतात. मात्र ही मंडळी अनेकदा मुळापासूनच झाड तोडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ही औषधी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच आंध्र आणि मराठवाड्यातील अनेक तस्कर या भागात वृक्ष तोडीच्या निमित्ताने शिरतात. त्यांना वनौषधीची माहिती नसते. ही मंडळी सरसकट अशा वृक्षांवर कुऱ्हाड चालवितात. असाध्य आणि विविध आजारावर रामबाण ठरेल असे औषध या वृक्षांपासून तयार करता येऊ शकते. या भागात वनौषधीवर एखादा प्रक्रिया उद्योग उभारल्यास बेरोजगारांना कामही मिळू शकते.
वनौषधीचा अनमोल खजाना दुर्लक्षित
By admin | Updated: June 23, 2014 00:22 IST