शिपायांच्या मोबाईलवर वॉच : कारभार सुधारा अन्यथा कारवाई- एसपींची तंबीयवतमाळ : स्थानिक गुन्हे शाखा आणि अधिनस्थ विशेष पथकातील काही कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचा संशय आहे. त्यातूनच जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पेशीत संबंधित कर्मचाऱ्यांना कारभार सुधारा, असा सज्जड दम भरला. कुणाचे गुन्हेगारांशी संबंध आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला. तसेच प्रत्येकाच्या मोबाईलवर आपला यापुढे वॉच राहणार असल्याचेही त्यांनी निक्षूण सांगितल्याची माहिती आहे. यवतमाळ शहरात टोळी युद्धातून आजवर अनेक शरीर दुखापतीच्या गंभीर घटना घडल्या. या घटना घडल्यानंतर आरोपी अथवा मारेकरी तत्काळ पोलिसांच्या हाती लागले, असे होताना दिसून येत नाही. स्थानिक गुन्हे शाखा आणि अधिनस्थ विशेष पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनेक आव्हानात्मक गुन्ह्यांचा छडा लावला. मात्र टोळी युद्धातून एखादी गंभीर घटना घडली की, त्यात मात्र आरोपी हाती लागत नाही. हा नेहमीचाच अनुभव झाला आहे. त्यामुळे पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी संबंध तर नाही ना, अशी कुजबुज खुद्द जिल्हा पोलीस दलात होती. नेमकी हीच बाब हेरून जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनीही गोपनीय माहिती मिळविली. त्यामध्ये या शंकेला पुष्टी मिळाली. तीन दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक शर्मा यांनी विशेष पथकांना पेशीत बोलावले. या वेळी गुन्हेगारांशी काही कर्मचाऱ्यांचे संबंध असल्याच्या बाबीवरून सर्वच कर्मचाऱ्यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. यापुढे सर्वच पथकातील कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर आपला वॉच राहणार असल्याचे सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
गुन्हेगारी वर्तुळात पोलिसांचे छुपे ‘कनेक्शन’
By admin | Updated: June 28, 2014 23:47 IST