यवतमाळ : अतिपावसाने जिल्ह्यातील चिबाड क्षेत्राची पीक परिस्थिती हाताबाहेर गेली असून शेतात अक्षरश: तळी साचली आहे. पिके पिवळी पडली असून सर्वाधिक फटका सोयाबीनला बसत आहे. महिनाभराची उघाड मिळाली तरी या शेतात आंतरमशागतीची कामे होण्याची सुतराम शक्यता नाही. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ७६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. महागाव तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ११२ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. महागाव पाठोपाठ इतर तालुके वार्षिक सरासरी ओलांडण्याच्या वाटेवर आहेत. सततचा पाऊस काही तालुक्यामध्ये प्रचंड हानिकारक ठरत आहे. यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांची प्रकाश संश्लेषण क्रिया थांबली आहे. याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात नदीकाठचा भाग, धरणालगतचा परिसर, खोलगट भाग, अशा ठिकाणची पिके मोठ्या प्रमाणात चिबाडली आहे. या भागात जमिनीची खतग्रहण करण्याची क्षमता संपली आहे. मुळे ढिली होऊन सडत आहेत. यामुळे काही ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. काही ठिकाणी खोड किडीचा ‘अटॅक’ झाला आहे. चक्रभुंग्याचेही आक्रमण झाले आहे. मात्र या रोगाचे प्रमाण कमी आहे. सोयाबीनची वाढ खुंटली पाणथळ जागेवर असलेले सोयाबीन वाढ खुंटल्याने वितभर असतानाच त्याला फुले लागली आहेत. या झाडाची वाढ खुंटल्याने पाणथळ जागेवर सोयाबीनचे उत्पादन घटण्याचा धोका आहे. उडीदावर मावाच्या ‘अटॅक’ यंदा उडीद आणि मुगाच्या क्षेत्रात वाढ झाली असली तरी मुगावर आणि उडदावर मावा, तुडतुडे या रसशोषण करणाऱ्या किडीचे आक्रमण झाले आहे. यामुळे पाने लालसर पडून गळत असल्याचे दिसत आहे. (शहर वार्ताहर) तूर जळाली : ३० टक्के क्षेत्र प्रभावित ४कडधान्याच्या क्षेत्र जिल्ह्यात यावर्षी सर्वाधिक आहे. यामध्ये प्रामुख्याने तूर पिकाचा समावेश आहे. जिल्ह्यात यावर्षी एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात अंतरपीक म्हणून तुरीची लागवड करण्यात आली. तुरीला अधिक पाणी घातक आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तूर जळाली. यानंतर शेतकऱ्यांनी दुबार टोबणी केली. मात्र ही तूर वानीने खाल्ली. यामुळे एकूण लागवडीच्या ३० टक्के क्षेत्र घटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पऱ्हाटी अजूनही पाच पानांच्यावर सरकली नाही ४जिल्ह्यात कापसाचे सर्वात मोठे क्षेत्र आहे. असे असले तरी अधिक पाण्याने पानबसन भागातील पऱ्हाटी खुलली नाही. तिची जोमाने वाढ झाली नाही. काही ठिकाणी तण वाढले. पऱ्हाटीपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात गवत दिसत आहे. या ठिकाणी तणनाशकाची फवारणी केल्यानंतरही गवत वाढल्याची बाब पुढे आली आहे. रोगाला अनुकूल अशी पीक परिस्थिती नाही. मात्र आणखी पाऊस आल्यास पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. उघाड पडल्यानंतर ढगाळी वातावरणाने अळीचा ‘अटॅक’ होण्याची भीती आहे. सध्या पीक निकोप अवस्थेत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी सजग राहून पिकांवर कुठल्या रोगाची लक्षणे दिसत आहे, त्यानुसार उपाययोजना कराव्या. - डॉ. अनिल ठाकरे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ
चिबाड क्षेत्रातील पीक धोक्यात
By admin | Updated: August 9, 2016 02:28 IST