‘मेडिकल’च्या स्वीय प्रपंच खात्याला सुरूंग : कर्मचाऱ्यांचा प्रताप, आॅडिटच नाही सुरेंद्र राऊत यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचार घेतलेल्या रुग्णांना पैशासाठी पळवून लावण्याचा प्रकार सुरू आहे. सेवा शुल्कासाठी आकारलेली रक्कम तडजोड करून काही कर्मचारीच खिशात घालतात. यासाठी हा गोरखधंदा केला जात आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने अनेक वर्षांपासून लेखा परीक्षण न केल्याचा हा परिणाम मानला जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरीब रुग्णांसाठी व सर्वसामान्य आर्थिक स्थिती असलेल्या रुग्णांसाठीसुद्धा नाममात्र सेवा शुल्क आकारून विविध तपासण्या केल्या जातात. ग्रामीण भागातील गरीब रुग्ण ही रक्कम भरण्यासाठीसुद्धा तयार असतो. मात्र अनेकदा येथील काही कर्मचाऱ्यांकडूनच फूस लावून या रुग्णांना पैसे न भरताच बाहेर सोडले जाते. विशेष म्हणजे यासाठी ठराविक रक्कम घेऊन ही मदत केली जाते. अशा प्रकारे रुग्णालयात उपचार घेऊन पूर्णपणे बरे झालेले मात्र सुटीनंतर पैसे न भरताच पळून गेलेल्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. महिन्याकाठी किमान २०० ते ३०० रुग्ण अॅप्सकॉड म्हणून नोंद केली जाते. पैसे न भरताच या रुग्णांना काढून दिले जाते. त्यासाठी त्यांच्याकडून ठराविक रक्कम घेण्यात येते. ग्रामीण भागातील रुग्णाच्या अज्ञानाचा फायदा काही महाठकांकडून घेतला जात आहे. यामुळे रुग्णालयाच्या स्वीय प्रपंच खाते निधीला सुरूंग लागला आहे. कमी दराच्या पावत्या देऊन आणि त्याही पुढे जात चक्क रुग्णांना पळवून लावण्याचा प्रकार सुरू आहे. या गंभीर प्रकाराची चाहूल लागल्यानंतर काही लिपिकांची रुग्णालय प्रशासन विभागातून बदली करण्यात आली. हा गंभीर प्रकार रुग्णालयाच्या प्रशासनाची धुरा सांभाळणाऱ्याच्या मूकसंमतीने सुरू होता. यातून वैद्यकीय महाविद्यालयाच्या उत्पादनातील लाखो रुपये हडपल्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षात वैद्यकीय शिक्षण व संशोधक संचालनालयाकडून स्वीय प्रपंच खात्यात येणाऱ्या रकमेची लेखा परीक्षणच करण्यात आली नाही. रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण आणि त्यांच्याकडून सेवा शुल्कापोटी मिळालेली रक्कम यात फार मोठी तफावत आहे. मात्र याचे लेखा परीक्षण न झाल्यामुळे हा संपूर्ण अपहार दडपल्या गेला आहे. कमिशनखोरीमुळे वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्वच यात गुरफटलेले असल्याने याची जाहीर वाच्यता व तक्रार करण्यात आलेली नाही. मेडिसीन, सर्जरी विभागातील सर्वाधिक रुग्णालयातील इतर विभागाच्या तुलनेत मेडिसीन आणि सर्जरी या दोन विभागात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय शस्त्रक्रिया झालेले रुग्ण अथवा मेडिसीन विभागात गंभीर स्वरूपाच्या आजाराच्या रुग्णांना दहा ते पंधरा दिवस थांबावे लागते. अशाच रुग्णांना हेरून फूस लावण्याचा प्रयत्न होत आहे. एकीकडे रुग्णालयातील किरकोळ दुरुस्तीसाठीसुद्धा वेळेवर निधी उपलब्ध होत नाही. दुसरीकडे हक्काच्या उत्पन्नाचा स्रोत परस्पर जिरविण्यात येत आहे.
पैशासाठी पळवून लावले जातात रुग्ण
By admin | Updated: April 25, 2015 23:52 IST