१२२ जागा : सत्ताधाऱ्यांचा लागणार कस, मतदारसंघाची पुनर्रचना यवतमाळ : जिल्ह्यातील १६ पंचायत समितींवरील वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यासाठी सध्या पक्षांतराला महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेत यापूर्वी ६२, तर १६ पंचायत समितींमध्ये १२४ जागा जागा होत्या. २०११ च्या जनगणनेनुसार यावेळी मतदार संघांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची एक, तर पंचायत समितींच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. परिणामी आता जिल्हा परिषदेत ६१, तर सर्व पंचायत समितींमध्ये १२२ सदस्य निवडून येणार आहे. त्यासाठी येत्या फेब्रुवारीत निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमुळे जिल्ह्याचा ग्रामीण भाग ढवळून निघणार आहे. जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. या दोन्ही पक्षांची तूर्तास सत्ता कायम आहे. बहुतांश पंचायत समित्याही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. ग्रामीण भागावर या दोन पक्षांची चांगलीच पकड आहे. मात्र गेल्या दोन वर्षात राजकीय चित्र पूर्णपणे पालटले आहे. केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीतही या दोन पक्षानी चांगलेच यश मिळविले आहे. त्यामुळे या दोनही पक्षांनी आता ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामीण भागावर पकड मजबूत करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर सत्ता स्थापन करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने या दोन्ही पक्षांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाचे औचित्य साधून इतर पक्षांतील कार्यकर्ते आपल्या जाळ्यात ओढण्याचे सत्र या पक्षांनी सुरू केले. यात काही कार्यकर्ते त्यांच्या गळालाही लागले. केंद्र आणि राज्यातील सत्ता व नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीतील निकालामुळे दुसऱ्या पक्षांतील काठावरील कार्यकर्ते या दोन पक्षांच्या मोहात अडकत आहे. यातून पंचायत समितींवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)
पंचायत समित्यांवर वर्चस्वासाठी रस्सीखेच
By admin | Updated: December 23, 2016 02:20 IST