मासिक सरासरी ओलांडली : निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले, सायखेडा धरण भरलेयवतमाळ : मान्सूनच्या सक्रियतेमुळे जिल्ह्यात गत २४ तासात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील पहिलाच मोठा पाऊस असल्याने प्रकल्प क्षेत्राच्या पाण्यात वाढ नोंदविण्यात आली आहे. पहिल्याच अतिवृष्टीने निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडण्यात आले. या पावसाने सायखेडा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. तर निळोणा प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याच्या वाटेवर आहे. या पावसाने जुलै महिन्याची मासिक सरासरी ओलांडली आहे. यामुळे खरिपाच्या पिकांना मोठा आधार मिळणार आहे. नागपूरच्या वेधशाळेने यवतमाळ जिल्ह्यात १० जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज प्रथमच खरा ठरला आहे. जिल्ह्यात सरासरी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. रविवारीही जिल्ह्यात धुवांधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे जलप्रकल्पातील पाण्याच्या साठ्यात मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.निम्न वर्धा प्रकल्पात जलसाठा वाढल्याने या प्रकल्पातील ३१ दरवाजे उघडण्यात आले. २० मिमी सेंटरने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर सायखेडा प्रकल्प सततच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयाच्या साठ्यात मोठी वाढ नोंदविण्यात आली. हा प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याच्या वाटेवर आहे. गत २४ तासामध्ये सर्वाधिक १२० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्या खालोखाल यवतमाळात १०९ मिमी पाऊस झाला. बाभूळगाव १०५ मिमी, झरी १०२ मिमी, कळंब ४८ मिमी, आर्णी ५५ मिमी, दारव्हा ४६ मिमी, दिग्रस ४२ मिमी, नेर ८० मिमी, पुसद २९ मिमी, महागाव ४२ मिमी, उमरखेड ९ मिमी, राळेगाव ९७ मिमी, घाटंजी १०८ मिमी, वणी ७८ मिमी तर मारेगाव तालुक्यात ९५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. (शहर वार्ताहर)३३२ मिमी पावसाची नोंद४जिल्ह्यात आतापर्यंत ३३२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्याची मासिक सरासरी २८३ मिमीची आहे. मासिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस अधिक आहे. यामुळे पिकांना पोषक वातावरण आहे. यातून पिकांची जोमाने वाढ होण्यास मदत होणार आहे.
अतिवृष्टीने अनेक प्रकल्प ओव्हरफ्लो
By admin | Updated: July 10, 2016 01:37 IST