नगरपरिषदेची पहिली शाळा : यवतमाळातील डिजिटल ग्रीन पार्क स्कूलची भरारी, पटसंख्याही झाली दुप्पट, मोफत अभ्यासवर्गअविनाश साबापुरे यवतमाळशिक्षक मनापासून झटले तर शाळेचा कायापालट कठीण नसतो. यवतमाळ नगरपरिषदेच्या दोन शाळा काही वर्षांपूर्वी पटसंख्येविना बंद पडल्या. गेडामनगरातील तिसरी शाळाही मरणासन्न अवस्थेतच होती. पण येथील शिक्षकांनी गेल्या चार वर्षात घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे ही शाळा नुसती तगलीच नाही, तर आज जिल्ह्यातील पहिली नगरपरिषद आयएसओ मानांकित शाळा बनली आहे. डिजिटल ग्रीन पार्क स्कूल म्हणून या शाळेचे नाव आदराने घेतले जाते.संजय गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. १८ काही वर्षांपूर्वी शहरातील विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ होती. पण कालांतराने नगरपरिषदेच्या शाळांची प्रतिमा मलीन होत गेली आणि गेडामनगरातील या शाळेलाही ओहोटी लागली. पटसंख्या झपाट्याने घटली. यवतमाळ नगरपरिषद इतर दोन शाळांप्रमाणेच ही शाळाही बंद करण्याच्या मानसिकतेत होती. पण येथील तंत्रस्नेही शिक्षक संजय चुनारकर यांनी नवनव्या उपक्रमांतून शाळेला नवसंजीवनी दिली. गेल्यावर्षी ३० असेलेली पटसंख्या यंदा ६० म्हणजे दुप्पट झाली. मुख्याध्यापिका ज्योती सावळकर आणि उपक्रमशील शिक्षिका मुक्ता लाड यांनीही धडाडीने काम सुरू केले. येथील शिक्षकवर्ग शहरातील दानशूर लोकांपर्यंत पोहोचला आणि शाळेसाठी लोकवर्गणीच्या कामाला वेग आला. आधी शिक्षकांनी स्वत: १० हजारांची वर्गणी केली. मग संस्कार एकता कलश ग्रपच्या महिलांनीही ८० हजार रुपयांची मदत केली. नगरपरिषद प्रशासनाकडून २० हजार मिळाले. शिक्षक संजय चुनारकर यांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी आणि मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून शाळेसाठी शाळेसाठी स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर, संगणक, स्कॅनर असे साहित्य मिळविले. शाळा डिजिटल झाली. ज्ञानरचनावादी अध्यापनासाठी प्रत्येक वर्गखोलीची खास रंगरंगोटी आणि रचना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, इंग्रजी भाषेतून ज्ञानरचनावाद या शाळेने अवलंबला आहे. शाळेच्या चारही बाजूंनी रस्ता आहे. सुसज्ज कंपाउंडच्या आत मोठ्या इमारतीच्या भोवती विस्तीर्ण मोकळे मैदान आहे. याच मैदानात वृक्षारोपणातून ग्रीनझोन करण्यात आला आहे. एका बाजूला वनौषधी प्रकल्प साकारण्यात आला. गांडूळखत प्रकल्पावर काम सुरू आहे. याच मैदानाचा काही भाग आता शेतीसाठी वापरण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला आधुनिक पद्धतीचा अॅथलेटिक्सकरिता ट्रॅक करण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. विशेष म्हणजे, या शाळेत सायंकाळी ६ ते ७ पर्यंत अभ्यासवर्ग घेतला जातो. शाळेचे विद्यार्थी तर या वर्गात येतातच, पण परिसरातील इतर शाळांचे विद्यार्थीही येतात. ज्यांना घरी अभ्यास करणे शक्य नाही, त्यांना या वर्गाचा फायदा मिळतो. त्यातून नगरपरिषद शाळेविषयी शहरातील पालकांची मानसिकता बदलण्यास मदत होत असल्याचे शिक्षक संजय चुनारकर म्हणाले. मोफत अभ्यासवर्गासोबतच हस्ताक्षर सुधार प्रकल्प, प्रत्येक शनिवारी होणारी बालसभा ही या शाळेची बलस्थाने ठरली. लोकांकडून मिळालेल्या १० हजार पुस्तकांचे शाळेत बालवाचनालय येथे आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना टॅब पुरवून दफ्तर हलके करण्याचा प्रयत्नही सुरू आहे.
बंदच्या वाटेवरील शाळा झाली आयएसओ
By admin | Updated: October 19, 2016 00:17 IST