गुन्हेगारी नियंत्रणात : अपघात, खुनाचा प्रयत्न, चोरीत मात्र वाढ यवतमाळ : जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यातील क्राईम रेकॉर्ड पाहता गंभीर गुन्ह्यांची संख्या चांगलीच रोडावल्याची नोंद आढळून आली आहे. त्याच वेळी अपघात, खुनाचा प्रयत्न, वाहन चोरी या सारख्या गुन्ह्यांमध्ये अल्पशी का होईना वाढ झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०१६ या काळात जिल्ह्यात विविध स्वरूपाचे चार हजार ८२२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये खून ६८, खुनाचा प्रयत्न ५८, सदोष मनुष्य वध ३, जबरी संभोग ८५, दरोडा ६, दरोड्याची तयारी २, जबरी चोरी ६९, दिवसा घरफोडी ६०, रात्री घरफोडी १७९, वीज वायर चोरी ११, जनावरे चोरी ४०, सायकल चोरी ७, ट्रक चोरी ९, कार-जीप चोरी ३, मोटरसायकल चोरी २११, वाहनांची सुटे भाग चोरी १८, इतर चोऱ्या ५२५, शेती अवजारे चोरी १११, जेबकट १८, दंगा-गर्दी १६०, अफरातफर २३, धोका ९१, घरात अनधिकृत प्रवेश ५५, पळवून नेणे ११३, दुखापत १२३४, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला ७८, विनयभंग ३२४, नवविवाहितांच्या आत्महत्या १७, इतरांच्या आत्महत्या ३९, अपघातात मृत्यू २८५, नकली नोटा ३ व इतर ८१७ गुन्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. ४८८२ पैकी ३७४१ गुन्हे उघडकीस आले आहेत. सुमारे सव्वा तीनशे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०१६ मध्ये दाखल गुन्ह्यांची सन २०१५ मध्ये याच ११ महिन्यात दाखल गुन्ह्यांशी तुलना केल्यास गुन्ह्यांच्या संख्येमध्ये एक हजार ९९ गुन्ह्यांनी घट झाल्याचे दिसून येते. खून, बलात्कार, दरोडा यासह गंभीर स्वरूपाच्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये घट दिसून येते. केवळ खुनाचा प्रयत्न, जनावर चोरी, सायकल चोरी, ट्रक चोरी, घरात अनधिकृत प्रवेश, अपघाती मृत्यू, आत्महत्या या काही गुन्हे प्रकारात किंचित वाढ झाली आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही बऱ्यापैकी असल्याचे दिसून येते. विविध प्रकारच्या चोऱ्या आणि घरफोडीचे सुमारे हजार गुन्हे नोंदविले गेले आहे. त्यात रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला गेला आहे. जिल्ह्यात अपघाती मृत्यूचे वाढलेले गुन्हे पाहता वाहतूक नियंत्रित करण्यात आणि अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसते. २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये गुन्हेगारी कमी झाल्याचे व डिटेक्शनचे प्रमाण ठिकठाक असल्याचे दिसत असले तरी या गुन्ह्यांमधील खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण किती हे पाहणेही महत्वाचे ठरते. (जिल्हा प्रतिनिधी) गुन्हे बर्किंग तर नाही ? गत वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पोलीस दप्तरी दाखल एकूण गुन्ह्यांमध्ये कमालीची घट दिसत असली तरी या घटलेल्या गुन्ह्यांबाबतही खुद्द पोलीस वर्तुळातूनच शंकेचा सूर आवळला जात आहे. वरिष्ठांची खपामर्जी नको आणि कामगिरी दाखविण्यासाठी गुन्हे बर्किंग करून तर गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचे रेकॉर्डवर दाखविले गेले नाही ना असा प्रश्नार्थक सवाल खाकी वर्दीतून पुढे येतो आहे. पोलिसांची एनर्जी गुन्हे होण्यापूर्वीच त्याला प्रतिबंध घालणे आणि घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी खर्ची होण्याऐवजी ‘वसुली’तच खर्ची होत असल्याचेही बोलले जाते.
जिल्ह्यात वर्षभरात गंभीर गुन्ह्यांची संख्या रोडावली
By admin | Updated: December 26, 2016 01:44 IST