विलास गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटी महामंडळाच्या स्थानकावरील सुरक्षेचा मुद्दा पुण्यातील घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. महामंडळाची कोलमडलेली आर्थिक स्थिती, करावी लागत असलेली काटकसर यामुळे सुरक्षा व्यवस्थेच्याा खर्चाला कात्री लावली जात आहे. पर्यायाने मध्यवर्ती ३२ स्थानके सोडली तर राज्यातील तब्बल ५४५ बसस्थानकांवर एकही सुरक्षा रक्षकही तैनात नाही.
महामंडळाने फक्त मध्यवर्ती बसस्थानकासाठीच सुरक्षा रक्षकांची तरतूद केली आहे. अशी स्थानके जिल्हा मुख्यालय ठिकाणी आहेत. त्यातही एका बसस्थानकावर १८ पेक्षा जास्त सुरक्षारक्षक नसावे (अपवाद पुणे येथील स्वारगेट व शिवाजीनगर प्रत्येकी २३) ही अट आहे. ३२ मध्यवर्ती बसस्थानकांवर प्रत्येकी १८ यानुसार ५७६ व पुणे येथील दोन बसस्थानकांवर जादा दहा सुरक्षा रक्षक मिळून ५८६ जणांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. परंतु, त्याहीपेक्षा कमी लोकांमध्ये काम भागविले जात आहे.
सुरक्षा व दक्षता खाते हतबल : एसटीचे सुरक्षा व दक्षता खाते कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने हतबल आहे. या विभागाला अधिकाऱ्यासह सहा काही ठिकाणी आठ पदे मंजूर असताना, केवळ तिघांवर काम ढकलले जात आहे. त्यातही मूळ कामे सोडून त्यांच्यावर इतर प्रकारची जबाबदारी वाढवून देण्यात आलेली आहे.
जिथे बलात्कार, त्या पुण्यात स्थिती काय?पुणे येथे महामंडळाचे ४२ बसस्थानक आहेत. यामध्ये अ वर्गातील सात, ब वर्गातील १२ आणि क मधील २३ बसस्थानकांचा समावेश आहे.यापैकी स्वारगेट आणि शिवाजीनगर या दोनच मध्यवर्ती बसस्थानकांवर प्रत्येकी २३ सुरक्षा रक्षक तैनात आहेत. उर्वरित ४० स्थानकावर एकही सुरक्षा रक्षक नाही.
किती सीसीटीव्ही सुरू?राज्यात २५१ आगार आहेत. अशा ठिकाणी असलेल्या बसस्थानकांमध्ये सीसीटीव्ही लावले असल्याचे सांगितले जाते. मात्र, यातील अनेक सीसीटीव्ही बंद असल्याचे समजते.
शिवशाहीतील कॅमेरे बंदलालपरीच्या ताफ्यात ५८० शिवशाही दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये एसी सोबतच कॅमेरेही होते. आज अनेक शिवशाही बसमधील कॅमेरे नादुरुस्त आहेत. काहींचे डिस्प्ले तुटलेले आहेत, तर काही गायब झालेले आहेत.