संतोष अरसोड - यवतमाळ राष्ट्रवादी काँग्रेसने ख्वाजा बेग यांना विधान परिषदेवर घेऊन जिल्ह्यातील आपली आमदार संख्या वाढविली. त्याचा सर्वाधिक फटका दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. या आमदारकीमुळे सेनेची डोकेदुखी वाढणार, एवढे निश्चित. बेग यांच्या आमदारकीने दिग्रस मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहे. काँग्रेस आघाडीची ताकद वाढल्याचे दिसत असले तरी धर्मनिरपेक्ष प्रतिमा असलेल्या बेग यांना अल्पसंख्यक समाज किती प्रतिसाद देतो यावर आघाडीचे राजकीय गणित अवलंबून आहे. एकीकडे मोदी लाट विधानसभेपर्यंत कायम राहून त्याचा फायदा महायुतीला होईल असे भाकीत वर्तविले जात आहे. अशातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बस झाल्या भानगडी नाहीतर आपण औषधालाही उरणार नाही असा पवित्रा घेतला आहे. राहूलसाठी माणिकरावांनी जिल्ह्यात आपल्या सोईने काँग्रेसच्या कोट्यातील आमदारकी दिल्यानंतर आता राष्ट्रवादीने ख्वाजा बेग यांना विधानपरिषदेवर पाठविले आहे. राजकीय खड्डयांची डागडूजी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. जिल्ह्यात दिग्रस मतदारसंघच शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचा विजयरथ रोखण्याचा प्रयत्न आघाडीकडून होणार आहे. याचाच परिणाम म्हणून दिग्रस मतदारसंघात प्रचंड उलथापालथ होणार आहे.२00४ च्या लोकसभा निवडणूकीत दारव्हा मतदारसंघातून भाजपा उमेदवाराने काँग्रेसच्या उत्तमराव पाटील यांच्यापेक्षा २५ हजार ६४६ मतांची आघाडी घेतली होती. २00९ च्या लोकसभा निवडणुकीत दिग्रस मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारावर शिवसेनेच्या भावना गवळी यांनी नऊ हजार ७३७ मतांची आघाडी घेतली. लोकसभेला दिग्रस मतदाससंघातून शिवसेनेला नऊ हजार ७३७ मतांची आघाडी तर विधानसभेच्या निवडणूकीत मात्र ५0 हजाराच्यावर मतांची आघाडी मिळते. यावरून दिग्रस मतदारसंघात जातीय समीकरणे प्रभावी ठरत असल्याचे सिध्द होते. मखराम पवार यांनी दीड दिवसाच्या प्रचारात माणिकराव ठाकरे यांना घाम फोडला होता. त्यावेळी उठलेल्या अफवेने माणिकरावांना तारले. त्यानंतर हा मतदारसंघ राखीव होण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र माणिकरावांना मतदारसंघ उरणार नाही म्हणून मग उमरखेड राखीव करण्यात आला. यासाठी प्रशासकीय हालचाली झाल्या अशी चर्चा त्यावेळी मतदारसंघात होती. मतदारसंघ राखीव न होणे आणि मखराम पवार यांची धडक हे गणित लक्षात ठेवून काही उमद्या कार्यकर्त्यांनी संजय राठोड यांचे कार्ड पुढे केले.
राष्ट्रवादीच्या आमदारकीने सेनेची डोकेदुखी वाढणार
By admin | Updated: May 31, 2014 00:12 IST