रुग्णही पळवितात : सारा डोलारा प्रशिक्षणार्थ्यावरयवतमाळ : गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बहुतांश डॉक्टरांनी शहरात आपली खासगी दुकानदारी सुरू केली आहे. मेडिकलमध्ये कमी आणि आपल्या क्लिनिकमध्ये अधिक वेळ देतात. परिणामी रुग्णांवर उपचार करण्याची वेळ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर आली आहे. त्यातच मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेले रुग्ण पळविण्याचा घाटही अनेकदा घातला जातो. मेडिकलच्या बाह्य स्वच्छतेसोबतच अंतर्गत स्वच्छताही करण्याची गरज निर्माण झाली आहे. यवतमाळ येथे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. जिल्हाच नव्हेतर लगतच्या जिल्ह्यातील आणि थेट तेलंगणातून रुग्ण येथे उपचारासाठी येतात. दिवसभरात बाह्यरुग्ण विभागात ८०० ते १००० रुग्णांची नोंद केली जाते. आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासावे, योग्य उपचार करावे, अशी प्रत्येक रुग्णाची इच्छा असते. मात्र वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची पाटी लावलेली असलेल्या कक्षात मात्र प्रशिक्षणार्थी डॉक्टरच उपचार करताना दिसतात. वरिष्ठ डॉक्टर केवळ सोपस्कार म्हणून आपल्या कक्षात येतात आणि कधी निघून जातात, हे प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि रुग्णांनाही कळत नाही. डॉक्टर नेमके जातात कुठे, याचा शोध घेण्याची कुणालाही गरज नाही. १० वाजता सरळ आपल्या खासगी रुग्णालयात जाऊन ओपीडीत मग्न होतात. रुग्णालयात तब्बल १४ विभागांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू आहे. या सर्वच विभागांमध्ये विभाग प्रमुख, सहयोगी प्राध्यापक आणि अधिव्याख्याता अशी पदे निर्माण करण्यात आली आहे. यातील बाह्यरुग्ण विभागाशी निगडित असलेल्या बहुतांश डॉक्टरांनी आपली खासगी दुकानदारी थाटली आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन टोलेजंग हॉस्पिटल शहरात उभारले आहे. काही वर्षाच्या कालावधीतच या डॉक्टरांनी फार मोठी गुंतवणूक खासगी रुग्णालयात केली आहे. मेडिकलमध्ये राहून आपल्या खासगी रुग्णालयाला रसद पोहोचविण्याचे काम त्या डॉक्टरांकडून होत आहे. यामध्ये सर्वच विभागातील डॉक्टरांचा समावेश आहे. मेडिसीन, सर्जरी, पॅथॉलॉजी, अर्थोपेडिक, बालरुग्ण, स्त्रीरोग, नेत्ररोग विभाग, यात आघाडीवर आहे. या प्रमाणेच इतरही विभागांना डॉक्टर खासगीत सेवा देताना दिसतात. काहींनी तर मल्टिस्पेशालिटीमध्येसुद्धा सेवा देणे सुरू केले आहे. राज्य शासनाच्या शासकीय डॉक्टरांची खासगी प्रॅक्टीस बंद करण्याबाबत स्वतंत्र आदेश काढला होता. या आदेशाविरोधात डॉक्टरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने शासनाच्या बाजूने निकाल देत खासगी प्रॅक्टीस करता येणार नाही, हे स्पष्ट केले होते. न्यायालयाचा आदेश आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने खासगी व्यवसाय करणाऱ्या अथवा खासगीत सेवा देणाऱ्या डॉक्टरांना नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात आली नाही. नवीन अधिष्ठाता डॉ.अशोक राठोड यांनी स्वच्छतेसोबतच रुग्णसेवेकडे लक्ष देण्याची गरज आहे. सहयोगी प्राध्यापक, विभाग प्रमुख, अधिव्याख्याता यापैकी फारच थोडे जण रुग्णालयात उपस्थित राहतात. अनेकांचे तर चेहरेही रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात नाही. (कार्यालय प्रतिनिधी)यवतमाळ बनले मेडिकल हबवैद्यकीय महाविद्यालयातील नोकरी सांभाळून खासगी दुकानदारी थाटण्याचा पायंडा यवतमाळात पडला आहे. त्यामुळेच अनेक डॉक्टरांनी येथे कायमस्वरूपी वास्तव्य केले आहे. आज यवतमाळात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कोट्यवधीच्या जागा शासकीय डॉक्टरांनी बळकावल्या आहे. यामुळे पश्चिम विदर्भातील मेडिकल हब म्हणून यवतमाळ नावारूपास येत आहे.पालकमंत्र्यांचे लक्ष हवे४यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांचा जिव्हाळ्याचा विषय रुग्णसेवा आहे. विरोधी आमदार असताना ना.राठोड यांनी रुग्णसेवेच्या मुद्यावर प्रशासनाला वेळोवेळी धारेवर धरले. आता मात्र सत्तेत आल्यानंतर रुग्णालयातील समस्या आणि कामचुकार डॉक्टरांबाबत त्यांची भूमिका मवाळ झाल्याचे दिसून येते. आकस्मिक भेटीत तंबी देण्यापलिकडे ठोस कारवाई रुग्णालयात झालेली नाही. रुग्णसेवक आमदार म्हणून ओळख असलेल्या संजय राठोड यांच्याकडून पालकमंत्री म्हणून रुग्णांना मोठ्या अपेक्षा आहे. यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात विविध सुविधा उपलब्ध आहे. परंतु इच्छाशक्तीअभावी त्याचा गोरगरिबांना फायदाच होत नाही. याकडेही पालकमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवे.
‘मेडिकल’च्या डॉक्टरांची खासगी दुकानदारी
By admin | Updated: May 12, 2015 02:12 IST