रितेश पुरोहित - महागाव
देशात सर्वत्र मोदी लाट असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अॅड. राजीव सातव विजयी झाले. विजयाच्या कारणांची मिमांसा करताना उमरखेड विधानसभेतील महागाव तालुकाही महत्वाचा ठरतो. या तालुक्यात सेना आणि भाजपाचा सूर निवडणूक काळात जुळलाच नाही. तर तालुकाध्यक्ष पदावरूनही शिवसेनेत शेवटपर्यंत कुरबुरी सुरूच होत्या. तसेच नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही मोदी लाटेचा अतिआत्मविश्वासही चांगलाच नडला. हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार सुभाष वानखडे यांचा पराभव झाला. युवक काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष आमदार अॅड. राजीव सातव यांचा अल्पमताने का होईना विजय झाला. उमरखेड विधानसभा मतदारसंघात सातव यांना एक हजार ४७९ मतांची आघाडी भेटली. काँग्रेसचे आमदार विजयराव खडसे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. शिवसेनेचा विजयरथ रोखण्यात उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा वाटा असला तरी ही आघाडी आणखीन मोठी राहू शकली असती. परंतु मतदारांना आकर्षित करण्यात स्थानिक नेते कमी पडल्याचे दिसून येते. शिवसेनेच्या पराभवात महागाव तालुक्याचाही वाटा आहे. या तालुक्यात शेवटपर्यंत भाजपा आणि सेनेचे सूरच जुळले नाही. शिवसेनेतही अंतर्गत कुरबुरी सुरूच होत्या. जिल्ह्यात कुठेही नसेल असे दोन तालुका प्रमुख येथे आहे. सुरुवातीला नियुक्त केलेल्या तालुका प्रमुखाबद्दल खासदार वानखडे यांची नाराजी होती. त्यानंतर त्यांनी आपल्या मर्जीतील व्यक्तीला तालुका प्रमुख केले. दोघेही तालुका प्रमुख म्हणून सध्या येथे आहेत. यातूनही शिवसेनेत धुसपूस दिसत होती. निवडणूक काळातही सुभाष वानखडे यांनी निवडलेलाच तालुका प्रमुख सक्रिय होता. त्यांनी कुणालाही विश्वासात घेतले नाही. देशात मोदीची लाट आहे. शिवसेनेचा उमेदवार सहज निवडून येईल या आत्मविश्वासात सर्वच होते. मात्र झाले उलटेच. महागाव तालुका यवतमाळ जिल्ह्यात येत असून हा तालुका यवतमाळ-वाशिम आणि हिंगोली या दोन मतदारसंघात विभागला आहे. शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिममधील उमेदवार भावना गवळी यांनी आपली निवडणूक आटोपल्यावर या भागात प्रचार केला. त्याचा फायदा सुभाष वानखडे यांना झाला. परंतु विजयात ते परावर्तीत करता आले नाही. विशेष म्हणजे सुभाष वानखडे खासदार असताना उमरखेड-महागावमध्ये त्यांच्या वाहनाची काच कधीही खाली झाली नाही. हा रोषही त्यांना या निवडणुकीत भोवला. काँग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांनी नियोजनबद्ध प्रचार केला. सर्वांना सोबत घेतले. त्यांच्यासाठी ना.मनोहरराव नाईक यांनीही ठिकठिकाणी सभा घेतल्या. बंजारा बहूल भागात बंजारी भाषेत भाषणे देऊन प्रचार केला. त्याचाही फायदा राजीव सातव यांना झाला. एकंदरित हिंगोली लोकसभा मतदारसंघात देशात मोदी लाट असतानाही काँग्रेसचा उमेदवार निवडून आला.