लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : युती धर्म आणि ‘मातोश्री’चा आदेश झुगारुन यवतमाळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरलेल्या शिवसेना बंडखोराच्या होर्डिंगवर चक्क शिवसेना प्रमुखांचे छायाचित्र झळकल्याने शिवसैनिक व मतदारांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.यवतमाळच्या बसस्थानक चौकात अपक्ष उमेदवार तथा शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांचे मोठे होर्डिंग लागले आहे. त्यावर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे झळकली आहेत. त्यामुळे या उमेदवाराला शिवसेनेचा छुपा पाठिंबा तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. या फलकामुळे सामान्य मतदारच नव्हे तर खुद्द शिवसैनिकही संभ्रमावस्थेत असल्याचे पहायला मिळते. ढवळे यांच्या बंडखोरीमुळे आधीच भाजप-शिवसेना युतीची मते विभागणार आहे. त्यात उघडपणे हा बंडखोर शिवसेनेच्या ‘मातोश्री’वरील प्रमुख नेत्यांचेच छायाचित्र झळकवित असल्याने युतीची हक्काची व विशेषत: शिवसेनेची मते या बंडखोराकडे वळण्याची भीती भाजपच्या गोटात वर्तविली जात आहे. बसस्थानक चौकातील हे फलक लागल्यानंतर भाजपकडून स्थानिक शिवसेना नेत्यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली. शिवसेनेने हा मुद्दा पक्षाचे संपर्क प्रमुख व विदर्भ समन्वयक यांच्याकडे पाठविला. या नेत्याने बंडखोर ढवळे यांच्याशी आपण स्वत: बोलून त्यांना समज देऊ असा संदेश स्थानिक सेना नेत्यांना पाठविला. परंतु गेली दोन दिवस लोटूनही ढवळेंचे ते फलक तेथेच कायम आहे.शिवसेनेचा छुपा पाठिंबा तर नाही ना ?जिल्ह्यातील सात पैकी एकाच मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार लढत असल्याने आधीच शिवसैनिकांमध्ये स्थानिक सेना नेतृत्वाविरुद्ध रोष आहे. नवा मतदारसंघ मिळविण्याऐवजी सेनेच्या कोट्यातील पुसदसुद्धा भाजपसाठी सोडला गेला. मुख्यमंत्र्यांची नाराजी नको हा स्थानिक सेना नेतृत्वाचा मतदारसंघ सोडण्यामागील खरा हेतू असल्याचेही शिवसेनेच्या गोटातून सांगितले जात आहे. त्यात आता सेना बंडखोराच्या फलकावर सेनेच्या श्रेष्ठींचीच छायाचित्रे झळकल्याने अनेक शिवसैनिक समाधानही व्यक्त करीत असल्याची माहिती आहे.सेना बंडखोराच्या फलकावर ठाकरे कुटुंबियांची छायाचित्रे झळकल्याचा प्रकार भाजपने निदर्शनास आणून दिला. त्यानुसार ही बाब पक्षाच्या मुंबईतील नेत्यांंना कळविण्यात आली. त्यांच्या स्तरावरून या प्रकरणात कारवाई होणार आहे.- पराग पिंगळे,जिल्हा प्रमुख शिवसेना
Maharashtra Election 2019 : सेना बंडखोराच्या होर्डिंगवर पक्षप्रमुखांचे छायाचित्र !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST
बसस्थानक चौकातील हे फलक लागल्यानंतर भाजपकडून स्थानिक शिवसेना नेत्यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली. शिवसेनेने हा मुद्दा पक्षाचे संपर्क प्रमुख व विदर्भ समन्वयक यांच्याकडे पाठविला. या नेत्याने बंडखोर ढवळे यांच्याशी आपण स्वत: बोलून त्यांना समज देऊ असा संदेश स्थानिक सेना नेत्यांना पाठविला. परंतु गेली दोन दिवस लोटूनही ढवळेंचे ते फलक तेथेच कायम आहे.
Maharashtra Election 2019 : सेना बंडखोराच्या होर्डिंगवर पक्षप्रमुखांचे छायाचित्र !
ठळक मुद्देशिवसैनिकांमध्ये संभ्रम : भाजपची तक्रार, प्रकरण ‘मातोश्री’वर