डॉक्टरच नाही : रूग्णांची होतेय हेळसांड, तालुका वैद्यकीय अधिकारी करणार उपचार कायर : गेल्या काही दिवसांपासून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने रूग्णांची चांगलीच हेळसांड होत आहे. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी सरपंच प्रिती बोरूले यांच्या नेतृत्वात कुलूप ठोकून संताप व्यक्त केला. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.कायर प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक गावांमधून रूग्ण उपचारासाठी येतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच या रूग्णालयाचा कारभार सुरू आहे. परिणामी गंभीर रूग्ण तथा प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना वणी येथे रेफर करावे लागत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजुर आहेत. पैैकी एक पद रिक्त असून एक कार्यरत डॉक्टर एक महिन्यापासून रजेवर गेले आहेत. परिणामी रूग्णांची हेळसांड होत आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी परिसरातील गावांमधील अनेक रूग्ण उपचारासाठी कायर प्राथमिक आरोग्य केंद्रात आले. मात्र येथे एकही डॉक्टर हजर नव्हते. ही बाब सरपंच प्रिती बोरूले व माजी सरपंच गोपालसिंह भदोरीया यांना माहित पडली. हे दोघे गावकऱ्यांसह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. त्यांनी रूग्णांच्या व्यथा जाणून घेतल्या. लगेच रूग्णालयाला कुलूप ठोकून तालुका वैैद्यकीय अधिकारी डॉ.विकास कांबळे यांना माहिती देण्यात आली. डॉ.कांबळे सकाळी ११ वाजता कायर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. त्यांनी रूग्ण व सरपंच प्रिती बोरूले यांच्याशी चर्चा करून जोपर्यंत याठिकाणी डॉक्टरची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत दररोज मी येथे येऊन उपचार करीन, असे आश्वासन दिले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कुलूप उघडण्यात आले. (वार्ताहर)
कायर प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले
By admin | Updated: September 11, 2016 01:04 IST