प्रकाश लामणे - पुसद जिल्हय़ातील दुसर्या क्रमांकाचे शहर असलेल्या पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव दिसून येत आहे. येथे सर्जन नसल्यामुळे शस्त्रक्रिया बंद असून तज्ञांअभावी सोनोग्राफी मशीन दोन वर्षांपासून धूळखात पडलेली आहे. येथील डॉक्टर रुग्णांना खासगी दवाखान्यात रेफर करीत असल्याने रुग्णांवर आर्थिक भुर्दंडड बसत आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रयत्नाने १९९२ मध्ये पुसद ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती झाली. तर ६ नोव्हेंबर २00४ रोजी या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला. या रुग्णालयात ५0 खाटांची व्यवस्था असून सुसज्ज इमारत, कोट्यवधीचा निधी, अद्ययावत यंत्रसामूग्री, तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती शासनाकडून केली जाते. मात्र मागील एक-दोन वर्षांपासून येथील कारभार पूरता ढेपाळला आहे. अनेक सुविधांचा अभाव दिसून येत आहे. या रुग्णालयात जवळपास एक वर्षांपासून सर्जन नसल्याने शस्त्रक्रिया करणे बंद आहे. त्यामुळे रुग्णांना सरळ खासगी दवाखाना किंवा यवतमाळ येथे पाठविण्यात येते. येथील देवी वार्डातील रहिवासी बंडू दत्तात्रय बोरकर (४५) हे मुतखड्याच्या आजाराने ग्रस्त असून सर्जन नसल्याने येथे शस्त्रक्रिया होणार नाही, तुम्ही यवतमाळला जा, असा सल्ला त्यांना येथील डॉक्टरांनी दिल्याचे बंडू बोरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. चंद्रकला ज्ञानदेव खुडे (६५) रा. मलकापूर ता. महागाव यांनी आपली आपबिती सांगताना, अंगात खूप दिवसांपासून ताप, खोकला व भोवळ येत असून डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. मात्र येथील मशीन बंद असल्याने खासगी दवाखान्यात नाईलाजाने जावे लागत आहे. यामुळे आर्थिक फटका बसत असल्याने दवाखान्याबाबत संताप व्यक्त केला. या रुग्णालयातत एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी एआरटी (अँन्टी रेट्रोव्हायरल थेरपी) सेंटर उघडण्यात आले. या सेंटरला जवळपास दीड हजार एड्स रुग्ण जुळलेले असून गोळ्यांची उपलब्धता असली तरी स्वतंत्र इमारत नसल्याने तारेवरची कसरत सुरू असल्याचे येथील डॉ. इंगळे यांनी सांगितले. या रुग्णालयातील एक्स-रे मशीन नियमित सुरू असून दररोज १0 ते १२ रुग्णांची तपासणी होत असल्याची माहिती तंत्रज्ञ कविता भांबुर्डेकर यांनी दिली. तज्ञांअभावी दोन वर्षांपासून सोनोग्राफी मशीन बंद असल्याचे येथील भाऊ चौरे यांनी सांगितले. सहायक नसल्याने एकाच व्यक्तीवर कामाचा ताण पडत असल्याची माहिती प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुजित आडे यांनी दिली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी असलेले शौचालयाच्या स्वतंत्र इमारतीला मागील सात वर्षांपासून कुलुपच असल्याचे येथील सफाई कामगार शशिकांत मोगरे यांनी सांगितले. एकंदरित पुसद शहर व तालुक्यातील जवळपास चार लाख नागरिकांच्या आरोग्यासाठी कोट्यवधी रुपये खचरून उभारलेल्या उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.
रुग्णालयात सुविधांचा अभाव
By admin | Updated: May 28, 2014 00:03 IST