सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी : जीवनात दु:ख आले तर निसर्गाशी मैत्री करा अविनाश साबापुरे यवतमाळ कुमारी माता हा प्रश्न यवतमाळसाठी कलंक ठरला. हा कलंक कसा पुसावा, हा पुरुषांना विचारण्याचा प्रश्न आहे. जेव्हा सर्व पुरुष स्वत:ची सामाजिक जबाबदारी स्वाकारतील, तेव्हाच तो सुटू शकेल. खरे तर, मुलांना आज सेक्स एज्युकेशन देणे अत्यंत गरजेचे आहे. पण मुले-मुली वयात येणे या बाबीकडे सध्या एखाद्या गुन्ह्याप्रमाणेच पाहिले जात आहे, असे रोखठोक मत प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. शनिवारी यवतमाळ येथे रोटरी क्लबच्या ‘एज्युफेस्ट’ कार्यक्रमाकरिता आल्या असता सोनाली कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखत दिली. त्यात यवतमाळच्या लोकांविषयी त्या भरभरून बोलल्या. त्या म्हणाल्या, इथले शेकडो तरुण-तरुणी, महिला-पुरुष आज मला भेटले. त्यांच्यात एक सळसळता उत्साह जाणवला. त्यांच्या वागण्यात अरेरावी नव्हती, तर सहजपणा होता. इथली माणसं ज्या आपुलकीने भेटली, ती आपुलकी मनाला जाऊन भिडणारी होती. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी महिलांना सोनाली कुलकर्णी यांनी खूप मार्मिक आवाहन केले. त्या म्हणाल्या, ‘गाभ्रीचा पाऊस’मध्ये मी ज्या महिलेची भूमिका केली, तशा हजारो महिला या जिल्ह्यात आहेत. त्यांना माझे एकच सांगणे आहे. मनुष्यजन्म भाग्याने मिळतो. तो कुणीही गमावता काम नये. मनात थोडासाही निराशेचा सूर उमटला तर आठवावे की, आपण पशू नाही माणूस आहोत. कोणत्याही परिस्थितीवर आपल्याला मात करता येते. आपल्या घरातला माणूस निराश दिसला तर त्याला धीर द्या. त्याच्याशी मोकळे बोला. स्त्रीच्या बोलण्यात ताकद असते. तीच पूर्ण घर नियंत्रित करू शकते. जीवनात दु:ख वाटले तर निसर्गाशी मैत्री करा. तो आपल्याला जगणे शिकवत असतो. आयुष्यात पहिल्यांदाच मी यवतमाळला आले. पण इथल्या शेतकऱ्यांसाठी मी वारंवार येणार आहे. आमीर खानच्या पाणी फाउंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. या फाउंडेशनमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील काही परिसरांची निवड झाली आहे. तेथे जनजागृतीसाठी मी नक्की येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, समाजातील अंधश्रद्धा मिटविणे या उद्देशानेही येथे येईल, अशी ग्वाही शेवटी सोनाली कुलकर्णी यांनी दिली. गोडच नव्हे, सत्यही बोला... हॅपी मकरसंक्रांती! अभिनेत्री असले म्हणून काय झाले? इतरांप्रमाणे मीही मकरसंक्रांती साजरी करते. या सणाला मी काळ्या रंगाचा मान ठेवते. काळीच साडी घालते. तिळाचे लाडू करून वाटते. पण केवळ परंपरा पाळण्यापेक्षा माझा सण थोडा वेगळा आहे. मकरसंक्रांती वाणीवर ताबा ठेवायला शिकवते. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणजे तेच. पण नुसते गोडच का बोला? सत्यही बोला. आप्तस्वकीयांना समजून घ्या. मी यवतमाळात मकरसंक्रांतीच्या दिवशी आले, इथल्या महिलांना माझा हाच संदेशरूपी वाण समजा... अशा ओघवत्या शैलीत उत्तरे देतानाच सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, हॅपी मकरसंक्रांती!
‘कुमारी माता’ हा पुरुषांना विचारण्याचा प्रश्न
By admin | Updated: January 15, 2017 01:01 IST