यवतमाळ : आंतरराष्ट्रीय स्तरावर हाैशी नेमबाज म्हणून मिरविणाऱ्या रणवीर रमन वर्मा याच्याकडून यवतमाळ पाेलिसांनी रायफली, जिवंत काडतुसे अशी घातक शस्त्रे जप्त केली. या कारवाईतूनच पाेलिसांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शासकीय शस्त्रागारातील शस्त्रे व काडतुसांची तस्करी करणाऱ्याची माहिती मिळाली. सापळा रचून त्याला देहरादून येथे शुक्रवारी अटक केली. या कारवाईने उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थान, दिल्ली येथे खळबळ उडाली आहे. शस्त्रतस्करांचे माेठे नेटवर्क रडारवर आले आहे. या तस्कराला न्यायालयाने शनिवारी ८ दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली तर रणवीर वर्मा याच्या काेठडीत ४ दिवसांची वाढ झाली आहे.
कामरान अहमद (रा. देहरादून, उत्तराखंड) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. कामरान हा शासकीय शस्त्रागारातून काडतुसे व रायफली मिळवून त्याची विक्री करत हाेता. यवतमाळात अटक केलेल्या रणवीर वर्मा याच्या कबुली जबाबातून ही माहिती पुढे आल्यानंतर यवतमाळ पाेलिसांचे पथक एसपी कुमार चिंता व सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात देहरादून येथे पाेहाेचले. शस्त्रतस्करीचे देशपातळीवरचे नेटवर्क उघड करण्यासाठी सहायक निरीक्षक संताेष मनवर, पवन राठाेड यांनी पथकासह देहरादूनमध्ये शाेधमाेहीम राबविली. कामरान अहमद याचे लाेकेशन येताच त्याला अटक करून देहरादून न्यायालयात हजर केले. तेथून ट्रान्झिट वाॅरंटवर यवतमाळ येथे आराेपीला आणले. येथे जिल्हा व सत्र न्यायालयाने आराेपी कामरान अहमद याला ११ जुलैपर्यंत पाेलिस काेठडी दिली.
कामरान अहमद याला यापूर्वी दिल्ली पाेलिसांनी २ हजार काडतुसांसह अटक केली हाेती. या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा शस्त्रतस्करी सुरू केली. यातूनच ताे रणवीर वर्मा आणि माे. अश्फार माे. असलम मलनस उर्फ भाया यांनी शस्त्रे खरेदी केली. या दाेघांजवळून पाेलिसांनी एक रायफल, एअर गन, डबल बाेअर शाॅट गन, ऑर्डिनन्स फॅक्टरी तयार झालेली रिव्हाॅल्व्हर, क्राॅसबाे दाेन (हंटिग गन), ३५० काडतुसे, बुलेटप्रूफ जॅकेट, तलवार, लाकडी बाॅडी बट, ३ रायफल स्काेप अशी शस्त्रे जप्त केली. ही आजपर्यंतची सर्वात माेठी कारवाई असून, यातून देशपातळीवरचे शस्त्रतस्करीचे नेटवर्क रेकाॅर्डवर आले आहे.
दिल्लीतूनही केली जातेय चाैकशीयवतमाळ एलसीबीने शस्त्रतस्कराचे देशपातळीवरचे नेटवर्क उघड केल्यानंतर आता वरिष्ठ तपास यंत्रणा जागे झाल्या आहेत. वाईल्ड लाईफ क्राईम कंट्राेल ब्युराे, एटीएस, आयबी, राज्य गुप्त वार्ता विभागाकडून याची चाैकशी केली जात आहे. या शस्त्रतस्करीची व्याप्ती माेठी असून, थेट शासकीय शस्त्रागारालाच सुरुंग लागल्याचे पुढे आले आहे.