मानसोपचार यंत्रणा नाही : ग्रामीण रूग्णालयात समुपदेशन केंद्राची आवश्यकता विठ्ठल पाईलवार झरीतालुक्यात दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. आत्महत्येचा विचार प्रथम मनात येत, मात्र यावर उपचाराची व्यवस्था ग्रामीण भागात कुठेही नाही.शारीरिक आजारावर उपचाराची व्यवस्था ग्रामीण स्तरापर्यंत पोहोचली आहे. मात्र मानसोपचार व्यवस्था शहरी भागातच व तीसुद्धा काही मोजक्याच ठिकाणी उपलब्ध आहे. धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात मानसिकदृष्ट्या निरोगी मनुष्य शोधून सापडणार नाही. शारीरिक आजार झाला तर, लगेच दवाखान्यात दाखविले जाते. चिंता, नैराश्य, अपराधीपणाची भावना, आत्मविश्वासाचा अभाव, बेकारी, कौटुंबिक कलह, वृद्धापकाळातील समस्या, प्रेमभंग यासारख्या अनेक समस्या या मानसिक आजारात मोडतात. मात्र समाजाचेही या बाबतीत सहकार्य लाभत नाही.आपणाकडे एखादी व्यक्ती वेडी झाल्याशिवाय तिला मानसिक रूग्ण म्हटले जात नाही. मात्र लाजाळूपणा, आर्थिक विकलांगता, अशा अनेक गोष्टीही मानसिक आजारात मोडतात. यावर पाहिजे त्या प्रमाणात समाज जागृकता झालेली नाही. सध्या अनेक गावात काही मनोरूग्ण, वेडी माणसे भटकताना दिसतात. त्यापैकी काही जण उपचाराने बरे होऊ शकतात. मात्र त्यासाठी कुणाकडेही वेळ नाही व सामाजिक भान नाही. अनेक नकारात्मक भावना व विचारांचे दमन, दीर्घकाळ झाल्यास त्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागतात. काही जण तसे पाऊलही उचलतात. तथापि, मूळ कारण मात्र बाजूलाच राहाते. सध्या ग्रामीण भागात मोठमोठे सरकारी दवाखाने उभारले जात आहे. त्यात एखाद्या मानसोपचार विभागाची व्यवस्था होणे गरजेचे आहे.झरीसारख्या भागात असा विभाग निर्माण करण्याची गरज आहे. यातून संकटांना तोंड देण्याची क्षमता त्या व्यक्तींमध्ये निर्माण केली जाऊ शकेल. सध्या योग्य रितीने जीवन जगण्यासाठी निरोगी मनाची गरज आहे. हा सर्व मानसशास्त्राचा भाग आहे. त्यावरील उपचाराची व्यवस्था जर ग्रामीण पातळीवर झाली, तर अनेकांचा वेळ व पैसा वाचेल. आत्महत्याही कमी करता येईल.
आत्महत्येच्या प्रमाणात झाली वाढ
By admin | Updated: October 19, 2015 00:23 IST