नीलेश यमसनवार - पाटणबोरीयेथून २० किलोमीटर अंतरावरील आंध्रप्रदेश सीमेवरील हिवरी येथे महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने मॅग्नीज दगडाचे अवैध उत्खनन सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे. सदर दगड रातोरात ट्रकमध्ये भरून आंध्रप्रदेशात जात असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे.हिवरी येथील एका वर्षभरापूर्वी आपल्या शेतकऱ्याने शेतात विहीर खोदायचे ठरविले होते. त्याने शेतात विहीर खणण्यास प्रारंभ केला होता. तयावेळी काही फूट खोल खणल्यानंतर त्याला खड्ड्यात चमकणारे दगड आढळले होते. सदर शेतकऱ्याने हे दगड गोळा करून आंध्रप्रदेशात तपासणीसाठी पाठविले होते. तेथे तपासणीअंती त्यात मॅग्नीज असल्याचे दिसून आले होते, अशी माहिती प्राप्त झाली. यानंतर सदर शेतकऱ्याने शेतातून हे दगड काढण्यासाठी शासनाकडे परवानगीसुध्दा मागितल्याची माहिती प्राप्त झाली. तथापि शासनाकडून परवानगी मिळत नसल्याने त्याने स्वत:च आंध्रप्रदेशातील एका कंपनीसोबत बोलणी करून सदर मॅग्नीज दगडाचे अवैध उत्खनन सुरू केले़ त्यानुसार हा दगड आजही आंध्रप्रदेशात पाठविण्यात येत आहे. आंध्रप्रदेशातील त्या कंपनीने महसूल प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन या मॅग्नीज दगडाचे उत्खनन अद्याप सुरूच ठेवले आहे. काही महिन्यांपूर्वी केवळ रात्रीच दगड काढला जात होता. मात्र आता अवैध उत्खनन करणाऱ्यांची हिंमत वाढल्याने त्यांनी थेट दिवसाच दगडाचे उत्खनन सुरू केले आहे. हे दगड राजरोसपणे ट्रकमध्ये भरून आंध्रप्रदेशात पाठविले जात असल्याची माहिती आहे. याममुळे एकीकडे पर्यावरणाची प्रचंड हानी होत असून शासनाची रॉयल्टीही बुडत आहे. परिणामी शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. मात्र महसूल प्रशासन दीड वर्षांपासून मूग गिळून आहे.हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून याची संपूर्ण उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणातील सर्वच दोषींचा तपास करून त्यांच्याविरुद्ध रितसर कारवाईची मागणी समोर येत आहे. याबाबत पांढरकवडा येथील नायब तहसीलदार राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असून त्याचा तपास करण्याची ग्वाही दिली. हिवरी परिसरात मॅग्नीज गोटा मोठ्या प्रमाणात आहे. अर्ली परिसरात सिलीकॉन व घुबडी परिसरात लाईमस्टोन मोठ्या प्रमाणात असल्याची माहितीही जाणकरांनी दिली़ ही सर्वच संपत्ती आता चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे स्पष्ट होत आहे.
मॅग्नीजचे अवैध उत्खनन
By admin | Updated: June 28, 2014 23:49 IST