दसऱ्यापूर्वी वेतनासाठी धांदल : माध्यमिकची बिले ‘क्लिअर’, प्राथमिकही वाटेवरअविनाश साबापुरे यवतमाळएक तारखेला वेतन अदा करण्याचा आदेश असतानाही ऐन सणासुदीच्या दिवसात जिल्ह्यातील शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यातल्या त्यात आश्रमशाळेतील शिक्षकांची तर मोठीच परवड होत आहे. निदान दसऱ्यापूर्वी तरी वेतन अदा करता यावे, यासाठी शिक्षण आणि लेखा विभागाची सध्या रात्रंदिवस धावपळ सुरू आहे. दरम्यान, पगारपत्रकांचा एमटीआर तयार करताना जीआयएस हेडपुढे ठरल्याप्रमाणे शून्य ही संख्या येत नसल्याने पगार अडल्याची माहिती सूत्रांनी दिली.अनेक शाळांतील शिक्षकांना सप्टेंबर महिन्याचा पगार अर्धा आॅक्टोबर उलटून गेल्यावरही मिळालेला नाही. काही शाळांना तर आॅगस्टचाही पगार मिळालेला नाही. अशावेळी आॅक्टोबरचा पगार नोव्हेंबरच्या एक तारखेला कसा अदा होईल, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. नोव्हेंबरच्या सुरवातीलाच दिवाळीसारखा सण असल्याने पगार वेळेवर करण्याची दक्षता सध्या वरिष्ठ पातळीवरून घेतली जात आहे. पूर्ण जिल्ह्यातील शाळांची पगारपत्रके जमा झाल्यानंतर लेखा विभागाचा एक एमटीआर (मंथली ट्रेझरी रिपोर्ट) बनतो. त्यात एकाही पगारपत्रकात एकाही हेडमध्ये चूक झाल्यास संपूर्ण बिले पुन्हा करावी लागतात. या एमटीआरमध्ये जीआयएस हेडपुढे शून्य संख्या येणे आवश्यक आहे. मात्र, सध्या ३५ शिक्षकांच्या पगारपत्रकात या हेडपुढे शून्याऐवजी १२० असा आकडा येत आहे. त्यामुळे तब्बल तीन वेळा एमटीआर बनवावा लागला. आता चौथ्यांदा हा घोळ होऊ नये म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व पंचायत समित्यांकडून पगारपत्रकांच्या प्रिंटआऊट मागविल्या आहेत. शिक्षण विभाग आणि लेखा विभागाने ही शक्कल लढविल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षक, १४४ केंद्रप्रमुख यांची बिले ‘क्लिअर’ झाली आहेत. प्राथमिक शिक्षकांचीही १६ पैकी १२ पंचायत समित्यांची बिले ‘क्लिअर’ झाली आहेत. मात्र, महागाव, मारेगाव, आर्णी आणि पुसद या चार पंचायत समित्यांकडून अजूनही पे-बिलांची प्रिंटआऊट न आल्याने हे काम काहीसे अडले आहे. मात्र, येत्या दोन दिवसात याही पंचायत समित्यांचे काम पूर्ण होऊन दसऱ्यापूर्वी सर्वांच्या हाती पगार पडेल, अशी माहिती लेखा विभागातील सूत्रांनी दिली.एमटीआरमध्ये (मंथली ट्रेझरी रिपोर्ट) थोडीशीही चूक झाली की, संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनास विलंब होतो. हा घोळ टाळून दसऱ्यापूर्वीच शिक्षकांच्या हाती पगार पडावा यासाठी निदान या महिन्यात तरी आॅफलाईन पगार काढण्यात यावा, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस गजानन देऊळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली आहे.‘त्या’ शिक्षकाचा अट्टहास नडलानियमित शाळेऐवजी आपल्याला शिक्षणाधिकारी कार्यालयातच काम करण्याची मुभा मिळावी, असा अट्टहास एका शिक्षकाने धरला होता. शालार्थ प्रणालीत काम करण्याचा त्यांचा हट्ट होता. परंतु, आरटीईनुसार शिक्षकांनी शाळेतच पूर्णवेळे देणे आवश्यक असल्याने या शिक्षकाची शिक्षणाधिकारी कार्यालयात डाळ शिजू शकली नाही. त्यांना आपल्या शाळेतच परतावे लागले. परंतु, त्यांच्या ढवळाढवळीमुळे पे-बिलांचे काम काही काळ रेंगाळल्याची माहिती सूत्रांनी दिली.आश्रमशाळा चार महिन्यांपासून ‘फुकट’दरम्यान पांढरकवडा प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेच्या शिक्षकांना तर या शैक्षणिक सत्रात एकदाही पगार मिळालेला नाही. जून महिन्यापासून शैक्षणिक सत्र प्रारंभ झाले. परंतु जून, जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर या चारपैकी एकाही महिन्यात त्यांना वेतन मिळालेले नाही. हे शिक्षक अक्षरश: फुकट काम करीत आहेत. आता आॅक्टोबरचा पगार तरी वेळेत मिळणार की नाही, याबाबत शिक्षकांमध्ये धाकधुक आहे. त्यामुळे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटना आंदोलन करणार असल्याचे अध्यक्ष संतोष अंगाईतकर, सचिव अरुण काळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
एका शून्यासाठी अडले हजारोंचे पगार
By admin | Updated: October 19, 2015 00:12 IST