केवळ ८२ पोलीस : तालुक्यात दुसरे पोलीस ठाणेच नाहीपांढरकवडा : तालुक्यात मागील पाच वर्षांत लोकसंख्येत भरमसाठ वाढ झाली. सोबतच गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र येथील पोलीस ठाणे व कर्मचाऱ्यांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नाही. परिणामी तालुक्यातील एक लाख ४० हजार जनतेची सुरक्षा केवळ ८२ पोलिसांवर येऊन पडली आहे. येथे अद्यापही ब्रिटिशकालीन आराखड्यानुसारच पोलीस ताफा असल्याने व सतत मंत्र्यांचा सुरक्षा बंदोबस्त करावा लागत असल्याने कार्यरत पोलिसांना जनतेची सुरक्षा करणे अवघड झाले आहे.पांढरकवडा तालुक्यात गेल्या पाच वर्षात ५५ घरफोड्या, ४३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आठ खून, ४० हून अधिक विनयभंगाच्या घटना, २५ च्यावर लुटमारीच्या घटना, २२५ च्यावर लहान-मोठे अपघात घडले आहेत. ६० हून अधिक लोकांचे अपघाती मृत्यू झाले. १२५ हून अधिक जखमी झाले. छोट्या-मोठ्या भांडण-तंट्यांची तर गिनतीच नाही. असे असतानाही एक लाख ४० हजार नागरिकांच्या सुरक्षेचा डोलारा केवळ ८२ पोलिसांवर येऊन पडला आहे.तालुक्यात १२४ गावे आहेत. क्षेत्रफळाने तालुका बराच मोठा आहे. पूर्व आणि पश्चिमेला असणाऱ्या दोन टोकांवरील गावाचे अंतर ४० ते ५० किलोमीटर आहे. आदिवासीबहुल असलेला हा तालुका आर्थिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेला आहे. तालुक्यात एकही मोठा किंवा लहान उद्योग नाही. परिणामी सुशिक्षीत बेरोजगाराची संख्या अधिक आहे. त्यामुळे एकूणच गुन्हेगारीला परिपूर्ण पोषक असे वातावरण तालुक्यात आहे. तालुक्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अवैध व्यवसाय, असामाजिक घटनांवर नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था, शांतता राखून सामाजिक आरोग्य राखण्यासाठी शासनाने तालुकास्थळी पोलीस ठाण्यांची निर्मिती केली. मात्र आता गावांची संख्या, लोकसंख्या, गुन्ह्यांची व गुन्हेगारांची संख्या वाढली. तथापि शासनाने पोलीस ठाण्यातील पोलिसांची संख्या मात्र त्या मानाने वाढविलीच नाही. तालुक्यातील १२४ गावांपैकी ११६ गावे पांढरकवडा पोलीस ठाण्याअंतर्गत येतात. येथे पोलीस निरीक्षक दर्जाचा ठाणेदार, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षकांसह ८२ पोलीस कार्यरत आहेत. मागील कित्येक वर्षांपासून पोलिसांची संख्या वाढली नाही. गुन्हेगारांकडून आता आधुनिक यंत्र , तंत्रवापरण्यात येते. मात्र गुन्ह्यांचा तपास अद्याप जुन्याच पद्धतीने केला जातो. पोलिसांकरिता मूलभूत सोयीही उपलब्ध नाही. त्यामुळे उपलब्ध पोलीस यंत्रणा गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात असमर्थ ठरत आहे. दरवर्षी गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी तालुक्यातील एक लाख ४० हजार जनतेची सुरक्षा धोक्यात सापडली आहे. (तालुका प्रतिनिधी)
पांढरकवडाच्या दीड लाख नागरिकांची सुरक्षा धोक्यात
By admin | Updated: December 31, 2015 02:45 IST