अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘अरे हे पोट्टे कास्तकारायले बह्याडच समजून राह्यले... मी म्हंतो का माहा बोट उमटत नसन तं माहे कागदं घे आन् मले वावराकडं जाऊ दे. पन थो म्हंते काम्पूटरमंदी बोट गेल्याबगर तुहं कामच होनार नाई... आता केवढ्याची आली! मुख्यमंत्र्याचं बी बरं हाये, योजनेचं नाव ठेवलं शेतकरी सन्मान, पन बोट लावू लावू ईचीन पाच दिसापासून घानाघान हाये... करशीन तं कर गड्या म्हना नाईकन तं होय पलीकडं...’७२ वर्षे वय झालेल्या लक्ष्मण पवार नावाच्या शेतकºयाचा हा त्रागा शनिवारी सेतू केंद्रातील संगणक आॅपरेटरला घाम फोडत होता. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर येत होता. पण त्रस्त आॅपरेटर आणि संतप्त शेतकरी अशा दोघांच्याही व्यथेवर फुंकर घालणारा कोणीच नव्हता. बकरी ईदची सुटी असल्याने संपूर्ण तहसील निपचित होते. पण सेतू केंद्राच्या कोपºयात लक्ष्मणरावसारख्या ५०-६० कास्तकारांनी गर्दी केली होती. सेतू केंद्राचा आॅपरेटर लॅपटॉपकडे डोळे लावून बसलेला. कास्तकार थम्ब मशिनवर बोट ठेवून उभा. दोघांच्याही तोंडून कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेला शिव्या. त्यातच लक्ष्मण पवार ओरडले, ‘लेकायनं कर्जमाफीले शिवाजी महाराजाचं नाव लावलं ना रे... मंग हे माया फारमावर फडणवीस दिसून राह्यले.. शिवाजीचा फोटो लावाले का गेल्तं तुहंवालं?’ कास्तकारांच्या गर्दीत घामाघूम झालेला आॅपरेटरही गांगरून गेला. तो म्हणाला, ‘बावाजी मले कायले इचारून राह्यला गा? आता लिंक भेटत नाई तं का डोस्क फोडू? तुमच्यावर दया करून कसंतरी करून पाहून रायलो तं तुमाले चौकशी सुचून राह्यल्या...’कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरताना शेतकºयांचे थम्ब संगणक प्रणाली स्वीकारतच नाही. लक्ष्मण पवार आणि त्यांच्या पत्नी शांताबाई यांनी २९ आॅगस्टला तहसीलमध्ये येऊन माहिती भरून दिली. पण रात्री ११ वाजेपर्यंत थांबूनही त्यांचा थम्बच स्वीकारला गेला नाही. ते रोज येत आहेत. जात आहेत. शेवटी शनिवारी पाचव्या दिवशी त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, बाबू माहा एक वावर कापºयाले हाये. दुसरं उलीसं पारव्याले हाये. गवतानं पºहाटीले पार दाबून टाकलं. पन बैलजोडीच नाही तं डवरा कुठून लावू? गावातल्या बड्या कास्तकाराले मह्यन्याभरापसून बैलं मांगून ठेवले तवा आज त्यानं घेऊन जाय म्हून सांगलं. इकून तिकून डवरा धरला, दोन वळी झाल्या तं ह्या पोराचा (संगणक आॅपरेटर) फोन आला का आज थम्ब लागू शकते. मंग तसाच धावत निंगून आलो... डवºयाले बैलं भेटले पन ह्या काम्पूटरले माहा बोट काई भेटून नाई राह्यलं! दोघं बी बुडा बुडी बसून हावो आता उपाशी तापाशी..!डोळ्यात पाणी, शब्द फरार..!कर्जमाफीच्या अर्जाला उशीर होत असल्याचे पाहून तावातावाने बोलणारे वयोवृद्ध लक्ष्मण पवार शेवटी मात्र हळवे झाले. ते पत्नीसह तहसीलमध्ये आले, शेतीच्या कामाचा खोळंबा. चार मुलं आहेत, पण त्यांचे दुकान ‘बसले’ हे सांगताना लक्ष्मणरावांच्या डोळ्यात टचक्न पाणी तरळले. ओठांवरून शब्द फरार झाले. आजूबाजूला खूप गर्दी असल्याचे लक्षात येताच डोळ्यातले पाणी कसोशीने रोखून पुन्हा बोलले, ‘बारा दिवसाचं निंदन झालं राजे हो.. उद्या मजुरी द्या लागते सातंक हाजाराची. येक पैसा नाई. कुठून होनार अन् कसं होनार मोठा ईचार हाये...’ मग मात्र शब्द कायमचेच गडप झाले. लक्ष्मणरावच्या चेहºयावरची चिंता बाजूच्या शांताबाईच्या डोळ्यात जाऊन मोठ्ठी झाली!
शेतकºयांचा सन्मान, कर्जमाफीने गहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:31 IST
‘अरे हे पोट्टे कास्तकारायले बह्याडच समजून राह्यले... मी म्हंतो का माहा बोट उमटत नसन तं माहे कागदं घे आन् मले वावराकडं जाऊ दे.
शेतकºयांचा सन्मान, कर्जमाफीने गहाण
ठळक मुद्देम्हाताºयांचा त्रागा : डवºयाले बैलं भेटले, पण कर्जमाफीले बोट नाई भेटून राह्यलं!