वणी : ‘विद्या गुरूहुनी थोर, आदर्श मातेचे उपकार’, अशी मातेची थोरवी अनेक धर्मग्रंथांनी गायिली आहे. त्याचा प्रत्यय तालुक्यातील नायगाव (बु.) येथे आला. मातेच्या तिरडीला मुलींनीच खांदा देत मुलीनेच मुखाग्नी दिला. रितीरिवाज, परंपरा मोडीत काढत तेथील पचारे कुटुंबियांनी एक आदर्श निर्माण केला.तालुक्यातील आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त म्हणून नायगावची (बु.) ओळख आहे. या गावात सर्व जाती, धर्माचे ग्रामस्थ गुण्यागोविंदाने वास्तव्य करतात. याच गावात वंशपरंपरेने पचारे कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील सर्वात मोठी सून गयाबाई विश्वनाथ पचारे होत्या. त्यांचे वार्धक्यामुळे व दीर्घ आजाराने नुकतेच २९ डिसेंबरला निधन झाले. मृत्युसमयी त्या ७५ वर्षांच्या होत्या. गावात सर्वांशी मिळून-मिसळून राहणाऱ्या आणि सोज्वळ स्वभावाच्या म्हणून त्यांची ओळख होती. सर्वांना पदरात घेण्याची त्यांची वृत्ती होती. याच वृत्तीमुळे त्यांना कधीही सासरे, दीर, पुतणे, नातू व सर्व सासूंनीसुद्धा कधीही दूर लोटले नाही. पचारे कुटुंबातील सर्व जण त्यांना ‘गयामाय’ म्हणून हाक माराचये. त्यांची ओवाळणी करायचे. गयाबाई यांना पोटच्या चार मुलीच आहेत. या चारही मुलींच्या शिक्षण, आरोग्य, आहाराच्या बाबतीत त्यांनी कधीही कसर सोडली नाही. पोटी पुत्र जन्माला आला नाही म्हणून त्यांनी कधी खंत वाटून घेतली नाही. मुलींनाच मुले समजून त्यांनी पालनपोषण केले. चौघींचेही लग्न पार पाडले. त्यानंतर चार जावई हेच, आपले मुले असल्याचे त्या नेहमी सांगत होत्या. हीच मोठेपणाची भावना जपत त्या जीवन जगल्या. पती विश्वनाथ यांच्या प्रत्येक कामात त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. संसारात वादळे आली अन् गेली. त्या कधी डगमगल्या नाहीत. धीर कधी सोडला नाही. त्यांच्या पतीनेही पत्नीधर्म पाळत आपल्या उतारवयात त्यांना दीर्घ आजारात खंबीर साथ दिली. ते सतत त्यांच्या पाठीशी उभे राहिले. अविरतपणे गयामायची सेवा, सुश्रुषा केली. मात्र जन्म झालेल्यांना मृत्यू अटळ असतो. त्यानुसार नियतीने २९ डिसेंबरला डाव साधला. त्या इहलोक सोडून निघून गेल्या.त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या चारही लेकींनी परंपरा मोडीत काढत नवीन निश्चय केला. परंपरागत कर्मकांड, स्त्री दास्यत्वाची प्रथा झुगारून त्या चारही मुली ‘माय’च्या अंत्यविधीसाठी उभ्या ठाकल्या. तिरडीला खांदा देणे, मुखाग्नी देण्याचा त्यांनी धाडसी निर्णय घेतला. त्यावेळी धर्मांधतेचे सोंग घेण्याऱ्या काहींनी त्यांना विरोध केला. मात्र या विरोधाला न जुमानता त्या चारही लेकींनी कार्यकर्त्तृत्व गाजविणाऱ्या मायच्या तिरडीला खांदा दिला. एकीने ‘आगट’ धरून समाजात क्रांतीचा संदेश देणारी मशाल हातात घेतली. विशेष म्हणजे या मायमाऊलीच्या एका विधवा ‘सावित्री’नेच मातेच्या चितेला मुखाग्नी देऊन परिवर्तनाची लाट निर्माण केली. मृतक गयामायला रेखा, सावित्री, मंगला व माया या चार मुली आहेत. मृत्युनंतर मुली, चारही जावई, नातवंड, सर्व नातलग गोळा झाले. त्यांनी गयामायला अंतिम निरोप देण्यासाठी हा वेगळा निर्णय घेतला. (कार्यालय प्रतिनिधी)
आईच्या चितेला मुलींनीच दिला मुखाग्नी
By admin | Updated: January 1, 2015 23:10 IST